सायन रूग्णालयात सर्जरीसाठी लागणारे कपडेही नाहीत; औषधांचा प्रचंड तुटवडा; गरीब रुग्णांना आर्थिक फटका

| Updated on: Jun 04, 2022 | 6:40 PM

रुग्णालयातील औषधसाठा संपत आल्यानंतर पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याकडून औषध खरेदीची निविदा प्रक्रिया रखडली गेली. त्याचा फटका रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना बसला आहे.

सायन रूग्णालयात सर्जरीसाठी लागणारे कपडेही नाहीत; औषधांचा प्रचंड तुटवडा; गरीब रुग्णांना आर्थिक फटका
डॉ मोहन जोशी, डीन,सायन रूग्णालय
Follow us on

मुंबईः मुंबई महापालिकेच्या सायन रूग्णालयात (Sion Hospital) औषधांचा प्रचंड तुटवडा पडल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. सायन रुग्णालयातील अत्यावश्यक आणि गरजेची असणारी अँटिबायोटीक आणि सलाईनही उपलब्ध नसल्याने अत्यावश्यक सेवा लागणाऱ्या रुग्णांना त्याचा फटका बसत आहे. रुग्णालयाच्या प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे गरीब रूग्णांवर बाहेरून औषधे विकत आणण्याची वेळ आहे. त्यामुळे सामान्य रूग्णांच्या खिशाला आर्थिक फटका बसत आहे. रुग्णालयाच्या या खर्चामुळे जनसामान्य माणसांचे आर्थिक गणितही कोलमडले आहे.

रुग्णालयातील औषध साठा संपला (Drug shortage) असल्याने सायन रूग्णालयाबाहेरील औषध दुकानांवर औषध खरेदीसाठी रूग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. औषधांसोबत इतर वैद्यकीय साहित्यही उपलब्ध नाहीत, ड्रेसिंग मटेरियमधील अनेक वस्तूंची वानवा रुग्णालयात जाणवत आहे.

मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) सायन रूग्णालयात महिनाभरापासून औषधांचा तुटवडा जाणवत आहे, मात्र त्याच्या कोणताही तोडगा न काढता पालिका प्रशासनाच्या केवळ बैठकांवर बैठका होत आहेत. त्यामुळे प्रशासन नेमकं काय करतं असा सवालही आता उपस्थित होऊ लागला आहे.

औषध खरेदीची निविदा प्रक्रिया रखडली

रुग्णालयातील औषधसाठा संपत आल्यानंतर पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याकडून औषध खरेदीची निविदा प्रक्रिया रखडली गेली. त्याचा फटका रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना बसला आहे. खरेदी खात्याकडून औषध साठा संपल्यानंतर खरेदी निविदी प्रक्रिया वेळेत केली गेली नाही त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.

औषध खरेदीसाठी जादा दर

स्थानिक पातळीवर औषध खरेदीसाठी जादा दर मोजावे लागत असल्यानं औषध खरेदी करण्यात आली नाही. तसेच रूग्णांची संख्या जास्त असल्याने स्थानिक पातळीवर खरेदी केलेली औषधे पुरत नसल्याचे सायन रूग्णायाने दावा केला आहे.

जाब विचारायला ना सत्ताधारी ना विरोधक

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका गरीब रूग्णांना बसत आहे. त्यामुळे प्रशासनाला जाब विचारायला ना सत्ताधारी ना विरोधक आहेत. त्यामुळे प्रशासनाचे आरोग्य व्यवस्थेकडं दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.

या औषधांचा तुटवडा

मुंबई महापालिकेच्या सायन रूग्णालयात अँटिबायोटिक ड्रग्ज आणि गोळ्या, सलाईन, भूल देण्यासाठी लागणारी ट्यूब, ड्रेसिंग मटेरियलचा तुटवडा, यामधील चिकटटेप तर दोन वर्षांपासून नसल्याची धक्कादायक माहितीही यावेळी देण्यात आली. सर्जरीकरिता डॉक्टर, नर्सेसना लागणाऱ्या कपड्यांचा नियमित पुरवठा होत नसल्याची माहिती डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.