म्हणून मी भाजपला लाथ घातली, रतन टाटांचं उदाहरण देत उद्धव ठाकरे काय म्हणाले

उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात बोलताना रतन टाटा यांची देखील आठवण सांगितली. मला दिल्लीकरांची पर्वा नाही. त्यांना गाडून मी भगवा फडकवून दाखवेल. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

म्हणून मी भाजपला लाथ घातली, रतन टाटांचं उदाहरण देत उद्धव ठाकरे काय म्हणाले
| Updated on: Oct 12, 2024 | 8:23 PM

उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात बोलताना म्हटले की, ‘प्रत्येकाकडे वेगवेगळी शस्त्र असतात. कुणाकडे तलवार आहे. कुणाकडे मशीनगन आहे. पण आमच्याकडे लढवय्या मन आहे. अेक वर्षाच्या परंपरेने ठाकरे कुटुंबीयाने जी शस्त्रपूजा केली. त्यात इतर शस्त्र आहेत, पण शिवसेना प्रमुखांचा कुंचला, ज्याने फटकारे मारले आणि मनगटात ताकद दिली. त्या कुंचल्याची पूजा केली. आता तुमची पूजा करत आहे. तुम्ही शस्त्र आहात.’

‘ही लढाई साधी नाही. एकाबाजूला अब्दाली, केंद्राची माणसं, सत्ता, तेव्हा जशा स्वाऱ्या यायच्या गावंच्या गावं उद् ध्वस्त करायची. आता त्यांनी मनसुबा आखलाय उद्धव ठाकरेंना संपवायचं. पण त्यांनना माहीत आहे, उद्धव ठाकरेंकडे ही समोरची वाघनखं आहेत. तुमचं पाठबळ नसतं तर मी उभा राहूच शकलो नसतो. तुम्ही आई जगदंबेसारखे उभे राहिला. मला कुणाची पर्वा नाही. त्यांच्या कितीही पिढ्या येऊ द्या. मी त्यांना गाडून उभा राहील.’

‘आजपासून प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेबांची मशाल बनून या सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही. उद्योगपती गेल्यानंतर हळहळ वाटणं दुर्मीळ झालं. टाटांसारखे उद्योगपती विरळ असतात. टाटांनी अनेक गोष्टी दिल्या. आपल्या जेवणातील लज्जत वाढवण्यासाठी टाटा नमक दिलं. आजचे उद्योगपती मिठागरे गिळत आहे. टाटा गेल्याचं दुख वाटतं. आणि मिठागरे गिळणारे जात का नाही याचं वाईट वाटतं. जे जायला पाहिजे ते जात नाही, जे जाऊ नयेत ते जात आहे. मी टाटांची आठवण सांगतो.’

‘शिवसेना प्रमुख गेल्यावर टाटा आले होते. ते म्हणाले तुला आणि मला मोठा वारसा आहे. तुला जसा शिवसेना प्रमुखांचा वारसा लाभला. तसा मला जेआरडी टाटांचा वारसा आहे. मी जेव्हा कामाला सुरुवात केली. तेव्हा निर्णय घेताना आज जेआरडी असते तर काय केलं असतं हे मला वाटायचं. पण नंतर लक्षात आलं की जेआरडीने माझं काम पाहिलं. स्टाईल पाहिली. मग त्यांनी जबाबदारी दिली. तशी तुझ्यावर शिवसेनाप्रमुखांनी तुझ्यावर जबाबदारी दिली. तुझी निवड केली. तुझ्यावर वारसा दिला. त्यामुळे तुला जे योग्य वाटतं तेच कर. मी आज तेच करतो. म्हणून मी भाजपला लाथ घातली.’