Supriya Sule: कुणावर विश्वास ठेवावा? केंद्रीय निवडणूक आयोगातील फुटीवरून सुप्रिया सुळे यांचा निशाणा, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागणार?

Supriya Sule on Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार विरुद्ध इतर दोन सदस्यांमध्ये मतभेद समोर आले आहेत. तर या दोन सदस्यांनी तक्रारीत जे गंभीर मुद्दे मांडले आहेत, त्यावरून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.

Supriya Sule: कुणावर विश्वास ठेवावा? केंद्रीय निवडणूक आयोगातील फुटीवरून सुप्रिया सुळे यांचा निशाणा, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागणार?
सुप्रिया सुळे, निवडणूक आयोग
| Updated on: Sep 23, 2026 | 11:32 AM

केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरुद्ध त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रारीचा पाढा वाचल्याचे समोर आले. पण त्यांनी SIR प्रक्रियेवरून जे दावे केले त्यावरून आता विरोधकांनी रान पेटवले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व घडामोडींवरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. तर आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याविषयी मोठे भाष्य केले आहे. दिल्लीत त्यांनी थोड्यावेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला.

हा तर मोठा धक्का

मला तर खरं आश्चर्य वाटत आहे, धक्काही बसला आहे. आमच्यावर अन्याय झाला. उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला. राजकीय मुद्दा म्हणून ते बाजूला ठेऊयात. पण सामान्यांच्या घटनात्मक अधिकारात गल्लत होत असेल तर ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे. हा राजकीय विषय नाही. हा लोकशाहीसाठी घातक विषय आहे. याविषयी सर्व राजकीय पक्षांना एकत्र बोलवून तातडीने बैठक घ्यावी. मनमोकळेपणे याची चर्चा व्हावी. निवडणूक आयोगावरील जे आरोप आहेत. त्या संस्थेतील लोक हे आरोप करत आहेत. ही सिस्टिमच कोसळत असेल तर कुणावर विश्वास ठेवावा असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला.

आयुक्तांनी राजीनामा द्यावा का?

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आयुक्त यांनी राजीनामा द्यावा का? या प्रश्नावर नैतिकता दाखवली पाहिजे असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले. हा केवळ राजकीय विषय आहे. हा देशातील प्रत्येक नागरिकाच्या अधिकाराचा विषय आहे. सशक्त लोकशाहीसाठी आजची बातमी धक्कादायक आहे. जगातील मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितले जाते. सर्वांना समान अधिकार मिळावा आणि प्रत्येक नागरिकाला एकाच मताचा अधिकार संविधानाने दिला. निवडणूक आयोगाची यातूनच स्थापना झाली. आम्ही आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगामुळे खूप भोगले आहे. त्याच निवडणूक आयोगाला मोडून काढण्याचे हे पाप आहे. हा अतिशय चिंताजनक विषय आहे. या संबंधी सरकारने तातडीने सर्व पक्षीय बैठक घ्यावी आणि चर्चा करावी. मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. निवडणूक आयोगात काम करणारेच लोक हे आरोप करत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. याविषयी इंडिया आघाडीची बैठक होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे

हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. उशिरा का होईना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौऱ्यावर जाणार आहेत, त्यांचे स्वागत आहे. शरद पवार यांच्या पत्रानंतर हे दौरे सुरू झाले आहेत. आमचे रोहित पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख शेतकऱ्याच्या बांधावर आहेत. उद्धव ठाकरे देखील शेतकऱ्याच्या बांधावर आहेत. सरकारच्या दौर्‍यातून शेतकर्‍याच्या पदरात काही तरी ठोस पडले पाहिजे. दुष्काळाच्या वेळी कुठलेही राजकारण न करता शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us