
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाईला राज्यमाता म्हणून घोषित केले होते. यामुळे आम्ही त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिण्याची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांचे नाव चांदीच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. जर एकनाथ शिंदे यांच्यासारखे काही दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केले तर आम्ही त्यांचाही विचार करू. जे विरोध करतात ते विरोध करतात, पण काम करणाऱ्याचेच नाव लिहिले जाते, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
गुजरातमध्ये गुजराती आणि महाराष्ट्रात मराठी बोलली जाते. मराठीच्या नावाखाली महाराष्ट्र वेगळा झाला. गुजरात गुजरातीच्या नावाखाली निर्माण झाला. मग आता मराठी मुंबई गुजरातमध्ये कसे जाईल. गुजरात महाराष्ट्रात कसा जाईल. भाषेच्या नावाखाली गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये झाली. मग हिंदी भाषा सुरू करून तुम्ही मुंबईला गुजरातशी कसे जोडणार? मुंबईला गुजरातशी जोडण्याच्या योजना जिथे बनवल्या जात होत्या, तिथे राज ठाकरे बसले होते का? असा उपरोधिक प्रश्न शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राज ठाकरे यांना विचारला.
राज ठाकरे आणि निशिकांत दुबे यांच्यात सुरु असलेल्या वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, हे राजकारणाचे मैदान आहे. दुर्दैवाने त्यात प्रवेश करणारे पैलवान हिंसाचाराची भाषा वापरत आहेत. निशिकांत दुबे असोत किंवा राज ठाकरे दोन्ही नेते हिंसाचाराची भाषा बोलत आहेत. बुद्धिमान लोकांनी हिंसाचाराला किती प्रमाणात स्थान देणे योग्य आहे? त्याचा विचार केला पाहिजे.
शिवसेना फुटीवर बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, जोपर्यंत आपण बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहू, तोपर्यंत प्रत्येक तुकडा, मग तो एक असो, दोन असो त्याला शिवसेना म्हटले जाईल. जेव्हा सगळे खरे असतात तेव्हा खोटे कोण? सगळे म्हणत असतात की आपण खरे आहोत, आपण खरे आहोत, असे त्यांनी म्हटले.
तुम्हाला हनी ट्रॅपपासून कोणीही वाचवू शकत नाही. फक्त धर्मच तुम्हाला त्यातून वाचवू शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात धर्म स्वीकाराल तेव्हा तुम्ही अशा अनैतिक गोष्टींपासून आपोआप दूर राहाल. मग कोणीही तुम्हाला हनी ट्रॅपमध्ये अडकवू शकणार नाही, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले.