Udhav Thackeray : पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास विरोध? उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सीमेवर जवानांचे बळी जात असताना क्रिकेट सामने खेळवणे हे देशद्रोहासारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सध्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Udhav Thackeray : पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास विरोध? उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांचे फटकारे
| Updated on: Jul 20, 2025 | 10:57 AM

पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाममध्ये हल्ला करून असंख्य निष्पाप भारतीय नागरिकांना ठार केलं. त्यामुळे देशभरातून या हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र पडसाद उमटले होते. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला धडाही शिकवला. मात्र, त्यानंतर भारत आणि पाकिस्तान संघाच्या दरम्यान क्रिकेट सामने सुरू झाल्याने देशवासियांमध्ये नाराजी पसरली आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नेमकी ही नाराजी बोलून दाखवली असून सरकारच्या या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दैनिक सामनातील मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आज प्रसिद्ध झाला आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत क्रिकेटच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. इकडे सीमेवर सैनिक शहीद होत असताना तुमची मुलं पाकिस्तानसोबतच्या क्रिकेटचा आनंद लुटत आहेत, अशा शब्दात त्यांनी केंद्रावर टीका केली आहे.

तरीही त्यांच्यासोबत खेळणार?

अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगत आहेत की, मी युद्ध थांबवलं. म्हणजे नेमकं काय? ट्रम्प म्हणाले तसं हजारो वर्षापासून नाही तर अनेक वर्षापासून हा प्रश्न धुमसतोय. काश्मीरचा धुमसतोय, पाकिस्तानचा धुमसतोय, पाकिस्तान आपल्याकडे अतिरेकी पाठवत आहे. त्यांनी पहलगाममध्ये अतिरेकी पाठवले. तरीही तुम्ही त्यांच्यासोबत क्रिकेट खेळ खेळणार आहात? इकडे जनतेच्या जीवाशी खेळ होतो. सैन्याच्या जीवाशी खेळ होतोय. तुम्ही मात्र तुमची क्रिकेट खेळून डिप्लोमसी करत आहात. दुबईत जाऊन तुमची मुलं पाकिस्तान बरोबरची मॅच एन्जॉय करत आहेत. इकडे जवान मरत आहेत. शेतकऱ्यांची मुलं जवान बनून सीमेवर जात आहेत. ही आपल्याच समाजातील मुलं आहेत. त्यांच्या जीवाशी खेळ होतोय, हे मात्र दुबईत जाऊन पाकिस्तानची मॅच एन्जॉय करत आहेत, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

थांगपत्ताच लागत नाही

पहलगाममधील अतिरेकी गेले कुठे? काश्मीरचा भौगोलिक दृष्ट्या जो परिसर आहे, तो सीमेजवळ आहे. त्यामुळे तिथे मोठी सुरक्षा असायलाच हवी. असं असताना अतिरेकी आत कसे आले? दोन तीन महिने झाले अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही. सापडणं सोडाच, पहिली चित्रे प्रकाशित केली गेली, त्यानंतर म्हणतात ते चित्र योग्य नव्हतं. अतिरेकी आपल्या लोकांना गोळ्या घालून गेले. डोळ्यात देखत गेले. हे सरकारचं अपयश आहे. तुमच्या म्हणण्यावरच लोक काश्मीरला गेले ना? तुमच्या भरवश्यावर गेले. आजपर्यंत तिकडे जायला लोक घाबरत होते. कधी काय होईल सांगता येत नव्हतं. आताचं काश्मीर वेगळं आहे, आताचा हिंदुस्थान वेगळा आहे. सरकार वेगळं आहे, असं तुम्हीच सांगत होता ना? असा सवाल त्यांनी केला. सत्यपाल मलिक जे बोललो त्यावर कोणी बोलत नाही. उलट त्यांच्यावर आरोपपत्र ठेवून त्यांना गोवलं गेलं, असंही ते म्हणाले.

सध्याचं नेतृत्व कचखाऊ

ऑपरेशन सिंदूरचा राजकारणासाठी वापर होतोय का? असा सवाल संजय राऊत यांनी त्यांना केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सडेतोड भूमिका मांडली. कुणाचा व्यापार करताय? कसला व्यापार करताय? त्यांनी निवडणुकीचा व्यापार केला. सत्तेचा व्यापार केला. देशाचा व्यापार करत आहे. या व्यापारापुढे त्यांना देशहित गौण वाटतं आहे. सध्याचं नेतृत्व कचखाऊ आहे, अशी टीका करतानाच शिवसेनेच्या वर्धापन दिनी मी म्हणालो होतो की, आज भाजपला पंतप्रधान आहे, भाजपला गृहमंत्री आहे, भाजपला संरक्षण मंत्री आहे. पण देशाला पंतप्रधान नाहीये, देशाला गृहमंत्री नाही. देशाला संरक्षण मंत्री नाही, अशी टीका त्यांनी केली.