
Sanjay Raut Criticized Eknath Shinde: मनसे आणि उद्धव सेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा केली. तर इतर महापालिकेत येत्या काही दिवसात घोषणा होईल. या घाडामोडींमुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह ओसांडून वाहत आहे. दोन्ही पक्षांच्या युतीमुळे शिंदेसेना आणि भाजपविरोधात जोरदार सामना रंगणार असे चित्र दिसत आहेत. आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत फ्रंटफुटवर येत तुफान बॅटिंग केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जबरी टीका केली.
त्या पक्षाचा बापच अनौरस
संजय राऊत यांनी स्वतंत्र विदर्भावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली. महापालिका निवडणूक होऊ द्या, कोणा कोणाची पोरं पळवतात हे समोर येईल असा चिमटा त्यांनी काढला. तर शिवसेना फोडण्याचे पाप देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे सेनेचा बापच अनौरस असल्याची जिव्हारी टीका त्यांनी केली. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाची मुलं सांभाळावीत. भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे. कुत्रे पकडण्याच्या गाड्या असतात. तसे पिंजरे भाजपने लावली आहेत. महापालिका निवडणुकीनंतर कुणाची मुलं, कोण पळवतंय हे समोर येईल, असा टोला त्यांनी लगावला. तर शिंदेंच्या पक्षाची मुलं ही अनौरस आहेत. स्वतःची मुलं नाहीत, त्यांचा पक्ष चोरीचा आहे. ज्या पक्षाचा बापच चोरीचा आहे. बापच अनौरस आहे.अमित शाह यांनी या पक्षाला आपलं नाव दिलं आहे. कळेल तुम्हाला महापालिकेनंतर कोणाची मुलं, कोण पळवतंय ते, असा जबरी टोला राऊतांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री
मराठी माणसासाठी गोपीनाथ मुंडे वगळता भाजपने कधी आवाज उठवला, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. बावनकुळे हे स्वतंत्र विदर्भ करणार असे अधिवेशन काळात बोलले. त्याच्याविरोधात ठाकरे उभे राहिले. कसा तोडता ते बघूच असे ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री काहीच बोलले नाही.या वक्तव्यावर मुख्यमं त्र्यांनी बावनकुळेंना जाब विचारायला हवा होता.त्यांनी जाब विचारला का? तुम्ही मराठी माणसासाठी आम्ही काय केलं, याचा काय जाब विचारताय. बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री झालात.नाही तर तुम्हाला एका छोट्या भागाचे मुख्यमंत्री व्हावे लागले असते असा टोला राऊतांनी फडणवीस यांना काढला.
आम्ही विदर्भ वेगळा होऊ देत नाहीत, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे. तुम्ही काय केलंत मराठी माणसासाठी हे दाखवा. गौतम अदानी यांना मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसांसाठी काम नाही. मोदींच्या मित्राच्या घशात फुकटात मुंबई घालणं, ही मुंबई, मराठी माणसांची सेवा आहे का तुमची? असा सवाल त्यांनी केला. दोन भाऊ एकत्र आलेत. दोन पक्ष एकत्र आलेत. सत्तेसाठी दोन्ही एकत्र आलेत.मग तुम्ही एकमेकांना काय चम्पी मालिश करण्यासाठी एकत्र आला आहात का? असा खरमरीत टोला राऊतांनी भाजप आणि शिंदे सेनेला लगावला.