मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; वाशी खाडी पुलाला लागून तिसऱ्या खाडी पुलाच्या कामाला प्रारंभ

कामात अनेक अडथळे आल्याने प्रत्यक्षात काम सुरू होत नव्हते. सुरुवातीला कांदळवनाचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. | Vashi Creek bridge

  • सुरेश दास, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 22:15 PM, 29 Nov 2020
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; वाशी खाडी पुलाला लागून तिसऱ्या खाडी पुलाच्या कामाला प्रारंभ

मुंबई: मुंबईच्या प्रवेशद्वारावर होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नियोजित असलेल्या तिसऱ्या खाडी पुलाच्या (Vashi creek) कामाचे आदेश अखेर एमएसआरडीसीने दिले आहेत. या कामाची मुदत नोव्हेंबर 2023 पर्यंत असून यासाठी 775 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामाला सुरुवातही झाली असून तीन वर्षांनंतर वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. (Third flyover in Navi Mumbai on Vashi creek)

कामात अनेक अडथळे आल्याने प्रत्यक्षात काम सुरू होत नव्हते. सुरुवातीला कांदळवनाचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. या पुलामुळे सुमारे दीड हेक्टरवरील कांदळवन नष्ट होणार असल्याने पुलासाठी परवानगी मिळत नव्हती.

त्यानंतर तेवढेच कांदळवन दुसऱ्या ठिकाणी लावण्याच्या अटीवर वन विभागाने रस्ते विकास महामंडळाला परवानगी दिली होती. कांदळवन लागवडीसाठी बोरीवली एरंगल येथे वन विभागाची जागा हस्तांतरित झाल्यानंतर या पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या कामाला सुरुवात झाली असून 2023 पर्यंत उड्डाणपूल अस्तित्वात येणार आहे. सध्या असलेल्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजुला नवीन उड्डाणपुलाच्या लेन उभारल्या जाणार आहेत. प्रत्येकी तीन तीन लेन सुरू होणार असल्याने वाशी टोलनाका आणि उड्डाणपुलावर होत असलेली वाहतूक कोंडी सुटणार आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ‘कोस्टल रोड’ची पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनी प्रियदर्शनी पार्क आणि हाजीअली भागातील ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. ‘कोस्टल रोड’मध्ये दोन मोठ्या बोगद्यांचं काम करण्यात येणार आहे.

हे दोन्ही बोगदे तीन पदरी आहेत. या सर्वसंदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कामगार आणि पालिका अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

लॉकडाऊनमुळे नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतचा 10 किलोमीटरचा कोस्टल रोडचे कामकाज सात महिने लांबणीवर पडले आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होणार होता. पण आता या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम 2023 पर्यंत होणे अपेक्षित आहे. वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंतचा कोस्टल रोडवरील प्रवास पूर्णपणे टोलमुक्त असेल.

संबंधित बातम्या:

सीएसएमटी स्टेशनबाहेरील ‘तो’ पूल पुन्हा बांधणार, सहा महिन्यात पूल खुला करण्याचा प्रयत्न

नवी मुंबई महापालिकेची भन्नाट आयडिया, फोटोतली बस नाही आहे ‘मोबाईल टॉयलेट’

मेट्रो प्रकल्पामुळे गिरगावातील क्रांती चाळ जाणार पडद्याआड

(Third flyover in Navi Mumbai on Vashi creek)