
Raj Thackeray on Devendra Fadnavis: मुंबई महापालिकेसाठी रणसंग्रामाला खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जागा वाटपाचे पत्ते न उलगडता दोन्ही ठाकरे बंधुंनी युतीची घोषणा केली. मुंबई महापालिकेत एकत्रित लढण्याचा निर्णय या निमित्ताने त्यांनी जाहीर केला. त्याचवेळी आपली खरी लढाई कुणासोबत असेल हे ही त्यांनी या पत्रकार परिषदेतून अधोरेखित केले. दोघांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपला मोठा इशारा दिला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांना मनसे-शिवसेनेच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.
मुंबईत युतीची घोषणा
राज ठाकरे यांनी आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या ऐतिहासिक युतीची घोषणा केली. 18 वर्षांनी दोन्ही बंधु एकत्रित निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राज ठाकरे यांनी दोन्ही पक्षांची मुंबई महापालिकेसाठीची युती जाहीर केली. तर इतर ठिकाणीही युती होणार असल्याचे सांगून टाकले. इतर 9 महापालिकेत दोन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचे समोर येत आहे. या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही ठाकरेंचा रोख हा भाजपच्याविरोधात दिसून आला.
माझ्याकडे असंख्य व्हिडिओ
यावेळी जुन्या आणि सोडून गेलेल्यांना पक्षात प्रवेश देणार का, असा सवाल माध्यमांनी विचारला असता, या जर तरच्या प्रश्नांना अर्थ नसतो. येऊ तर देत पहिलं, असे म्हणत राज ठाकरे यांनी जर तर वर भाष्य करण्यास नकार दिला. त्यांनी यावेळी मुंबई महापालिकेवर मराठी माणूसच महापौर होईल असे ठामपणे सांगितले. मुंबई महापालिकेवर भगवा फडकेल आणि मनसे-शिवसेनेचाच महापौर असेल असे जाहीर केले. तर भाजप आणि शिंदे सेनेच्या टीकेलाही त्यांनी जोरदार उत्तर दिले.
एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ फिरत आहे.त्यात ते अल्लाह हाफीज म्हणत आहेत.त्यांनी मला या गोष्टी सांगू नये. माझ्याकडे खूप व्हिडीओ आहेत.ते काय बोलतील त्यावर मी व्हिडीओ लावणार आहे, असा इशाराही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक प्रचारात मोठी खळबळ उडणार आणि दोन्ही बाजूने तिखट प्रतिक्रिया आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार असे दिसत आहे.
मराठी माणसाला काय हवं ते आम्ही पाहू
यावेळी भाजपला काय हवं ते भाजपने पाहावं.मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहत आहोत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.तर शरद पवारांशी चर्चा सुरू आहे. आम्ही आमची युती जाहीर केली आहे. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. जे भाजपातील अस्सल मराठीही येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे.काही भाजपमध्ये आहेत, ज्यांना भाजपचं सहन होत नाही, ते येऊ शकतात, अशी खुली ऑफरही उद्धव ठाकरे यांनी दिली.काँग्रेसने स्वबळावर लढायचं जाहीर केलं. आता आणखी का बोलायचं. कोण काय म्हणतंय त्याच्याशी कर्तव्य नाही. मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला काय पाहिजे ते आम्ही पाहत आहोत. सर्व पक्ष बाहेर पडून आघाडी आबाधित आहे, असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं.