
Mumbai Municipal Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी नवीन अपडेट समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात जागा वाटपाचा तिढा सुटल्याची चर्चा समोर येत आहे. आज या दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठी माणसांची मतं आपल्या पारड्यात पडावी यासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांनी मोठी खेळली आहे. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास मराठी माणसांच्या मतांचे विभाजन होणार नाही. त्यांच्यासमोर एक सक्षम पर्याय असेल. महायुतीसमोर यामुळे मोठे आव्हान उभं ठाकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी चर्चेची अंतिम फेरी झाली. त्यानंतर ठाकरे बंधुंमध्ये जागा वाटपावर सहमती झाली.
सहमतीसाठी चर्चेच्या फेऱ्या
जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठी भूमिका निभावल्याचे समजते. त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. 10-12 जागांबाबत जो तिढा होता. त्यावर सहमती झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर मनसे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे मातोश्रीवर पोहचले. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना 150 हून अधिक जागा लढवण्याची शक्यता आहे. तर मनसे 60 ते 70 जागांवर त्यांचे उमेदवार मैदानात उतरवेल. तर उर्वरीत राजा या शरद पवार राष्ट्रवादी पक्ष आणि इतर मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेसचे मन वळवण्यात येईल यश?
दरम्यान खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्याशी संपर्क केल्याची माहिती पण समोर येत आहे. आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढावी यासाठी त्यांची आग्रही भूमिका त्यांनी मांडली. काँग्रेसने मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. पण शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी महाविकास आघाडी एकजुटीसाठी प्रयत्न करत आहेत. या एकजुटीमुळे महायुतीचा पराभव करणं सोपं जाईल असा दावा करण्यात येत आहे. आज शिवसेना आणि मनसे यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा NSCI डोममध्ये संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे करण्यात येणार असल्याचे समजते.
काही जागांबाबत चर्चा
अर्थात काही जागांबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे. त्यानंतरच या दोन्ही पक्षाच्या युतीसंदर्भात घोषणा होणार आहे. मराठी आणि मुस्लिम मतांची एकजूट झाल्यास महायुतीला आव्हान देता येईल अशी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे सेनेत जागा वाटपांवर चर्चा सुरू आहे. लवकरच दोन्ही पक्ष याबाबतची घोषणा करतील अशी माहिती समोर येत आहे.