Nagar Parishad Election Result: मंचर नगरपंचायतीत उमेदवाराला चक्क एकच मत, आता आम आदमी पक्षाने घेतला हा मोठा निर्णय
Manchar Nagar Panchayat Election Result: पुणे जिल्ह्यातील आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंचरमध्ये नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक चांगलीच गाजली. आता या निवडणुकीत सलीम बशीर इनामदार यांना केवळ एकच मत पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी आता आम आदमी पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.

Nagar Panchayat Election Result: पुणे जिल्ह्यातील एक आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणारे मंचर गेल्या काही दिवसांपासून राजकीय दृष्ट्या राज्याच्या पटलावर आले आहे. यंदा मंचर नगरपंचायतीसाठी पहिलीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये मतदारांनी महायुतीमधील एकनाथ शिंदे सेनेचे उमेदवार लक्ष्मण मारुती पारधी तर भाजपच्या ज्योती संदीप बाणखेले यांना समान मतं दिली. त्यामुळे नशीबाचा कौल पुढे आला. त्यात एका मुलाला चिठ्ठी उचलण्यास सांगितले. या ईश्वरीय संकेतात लक्ष्मण पारधी यांचं नशीब बलवत्तर ठरलं. तर दुसरीकडं उमेदवार सलीम बशीर इनामदार यांना केवळ एकच मत पडल्याने त्यांनी निवडणूक प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. याप्रकरणी आता आम आदमी पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.
सलीम बशीर इनामदार यांना केवळ एकच मत
ईव्हीएम यंत्रणेबाबत वेळोवेळी शंका उपस्थित केल्या जात असतात. काही काळापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी होत असल्याचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर उपस्थित केला होता. मात्र नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अशा स्वरूपाचे आरोप फारसे समोर आले नव्हते.अशातच उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. आपचे उमेदवार सलीम बशीर इनामदार यांना केवळ एकच मत पडलं आहे.
आप जाणार हायकोर्टात
केवळ एकच मत पडल्याने सलीम इनामदार नाराज झाले आहेत. त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार सलीम बशीर इनामदार यांना केवळ एकच मत मिळाल्याने त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणी आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी दर्शवली आहे.
एका मताने कुठे पराभव कुठे विजय
रविवारी 21 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायतींचा निकाल आला आहे. यामध्ये राज्यातील चार ठिकाणी विविध पक्षांचे उमेदवार एका मतांनी जिंकले आहेत. गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्रीकांत देशमुख यांचा एका मताने विजय झाला. भाजपचे उमेदवार संजय मांडवगडे यांना 716 मतं पडली. तर देशमुख यांना 717 मतं पडली. प्रभाग क्रमांक 4 मध्ये देशमुख अवघ्या एका मताने जिंकले. तर पालघरमधील वाडा नगरपंचायतीमध्ये सुद्धा असाच अनुभव आला. उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार प्रिया गंधे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपच्या सिद्धी भोपतराव यांचा एका मताने विजय झाला.
