‘ठाकरे नाव नाही तर ताकद, सरकारलाही झुकवते,’ शिवसेना उबाठाचे बॅनर चर्चेत, मनसेच्या…
शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर 'ठाकरे हे केवळ नाव नाही ती ताकद आहे जी सरकारलाही झुकवते,' अशा आशयाचे बॅनर लावत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

राज्य शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला. हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात शिवसेना उबाठा आणि मनसेकडून ५ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु त्यापूर्वीच शासनाकडून निर्णय मागे घेण्यात आला. आता दोन्ही पक्षांने बॅनरबाजी सुरु केली आहे. ‘ठाकरे हे केवळ नाव नाही ती ताकद आहे, जी सरकारलाही झुकवते…,’ अशा आशयाचे बॅनर कल्याणमध्ये शिवसेना उबाठाने लावले आहे. मनसेकडून नंदुरबार जिल्ह्यातील शालेय मुलांचा फोटो असलेले बॅनर लावले आहे. नदीवर पूल नसल्यामुळे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत त्या फोटोतून दाखवत राज्य शासनाला यापेक्षा हिंदी सक्ती महत्त्वाची वाटते का? असा प्रश्न विचारला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू एकत्र यावे, अशी मागणी गेले काही दिवसांपासून कार्यकर्त्यांकडून केली जात होती. दोन्ही ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात एकत्र येण्याच्या प्रयत्न सुरू असताना शासनाने हिंदी भाषा सक्तीचा आदेश मागे घेतला. हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी ५ जुलै रोजी एकत्रित मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. परंतु सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द झाला.

राज आणि उद्धव यांचा हात मिळवतानाचा फोटो
आता शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर ‘ठाकरे हे केवळ नाव नाही ती ताकद आहे जी सरकारलाही झुकवते,’ अशा आशयाचे बॅनर लावत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हात मिळवत असल्याचा फोटो देखील लावण्यात आला आहे. यामुळे या बॅनरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे
मनसेचा शिवसेना भवनासमोर बॅनर
शिवसेना उबाठापाठोपाठ मनसेने दादरमधील शिवसेना भवनासमोर बॅनर लावला आहे. या बॅनरवर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांची गंभीर समस्या मांडली आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कसरत करत नदी ओलांडावी लागते. मुले झाडांच्या फांद्या पकडून नदी पार करतात. हा फोटो लावून मनसेकडून मार्मिक टोला राज्य शासनाला लगावला आहे. राज्य शासनाला यापेक्षा हिंदी सक्ती महत्त्वाची वाटते का ? असा प्रश्न विचारला आहे.
