Vijay Wadettiwar: कुणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिली? वडेट्टीवारांचा मनोज जरांगेंवर निशाणा, कुणबी नोंदीचा वाद पेटला, अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक
Vijay Wadettiwar On Manoj Jarange: कुणबी नोंदीचा वाद पुन्हा पेटला आहे. मराठवाड्यातील काही लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने जरांगेंना धक्का बसल्याचे मानले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटला आहे. मराठा समाजातील कुणबी नोंदी सापडलेल्या काही लोकप्रतिनिधींचे जात प्रमाणपत्रच रद्द झाल्याने चळवळीला धक्का बसला आहे. आज अंतरवाली सराटीत याविषयीची मोठी बैठक होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगेंसह सरकारवर निशाणा साधला आहे. फडणवीस सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून कायदेशीर कारवाई करावी आणि प्रमाणपत्र द्यावे अशी आमची मागणी आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
कुणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिली?
काही प्रमाणपत्र रद्द झाली आहेत. ते नियमात बसत नसल्याने त्यांची व्हॅलेडिटी होत नाहीये. पर्यायानं जात प्रमाणपत्राच्या आधारावर अनेकांनी तिकडे निवडणूक लढली. जिंकून आले. काही हरले असतील. त्यांचा वेळ गेला. सरकारचेही पैसे गेले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्या जागा आज रिक्त कराव्या लागतील. जागा रिक्त झाल्या तर पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया करावी लागेल. नागपूर जिल्हा परिषदेतही असंच झालं होतं. तीच प्रक्रिया पुन्हा मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे होईल. मी खात्रीने सांगतो की, जरांगे पाटील हे त्यांच्या समाजासाठी लढत आहेत, त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. ज्याने त्याने आपल्या समाजासाठी लढलं पाहिजे. पण ते अशापद्धतीने जर जात प्रमाणपत्र रद्द होत असेल. व्हॅलिडिटी मिळत नसेल तर मग ते नियमबाह्य काम सरकारने का कराव? कोणासाठी झुकून करावं? कुणाच्या दबावाखाली करावं? हे सरकारने ठरवलं पाहिजे. कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा कोणीही व्यक्ती मोठा नाही. त्यामुळे फडणवीस सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून कायदेशीर कारवाई करावी आणि प्रमाणपत्र द्यावे अशी आमची मागणी आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधी ज्योती सुधाकर शिंदे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले. ज्योती सुधाकर शिंदे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोलटगाव जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात चर्चेला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात इतर लोकप्रतिनिधी सुद्धा दाखल होणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि लोकप्रतिनिधींची बैठक होईल. बैठकीत जरांगे पाटील आणि लोकप्रतिनिधींमध्ये काय चर्चा होते याकडे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान कुणबी प्रमाणपत्र काढून निवडणूक लढवली होती त्या 4 सदस्यांच्या प्रमाणपत्रावर जात पडताळणी समितीकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक
मनोज जरांगे पाटील यांच्या आरपारच्या लढाईच्या पार्श्वभुमीवर ओबीसींचं बेंगळूरुमध्ये राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा विरोधात उद्याच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ओबीसी नेते ठराव पारीत करणार आहेत. जरांगे पाटील यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी संपूर्ण ओबीसी समाज सज्ज आहे. उद्या होणार पुढील लढ्याबाबत विचारमंथन सुरू असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले. आता काँग्रेसमधे नव्याने ओबीसी नेते तयार झाले आहेत, त्यांना जय ओबीसी म्हणायला लाज वाटते, नाव न घेता बबनराव तायवाडे यांचा विजय वडेट्टीवार यांना टोला लगावला. महाअधिवेशनासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेंगळुरू कर्नाटक येथे दाखल झाली आहे.