
Uran Municipality Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने स्थानिक पातळीवर कुठे स्वबळाचा, कुठे महायुतीचा तर काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढतीचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा हुंकार भरला आहे. त्याचवेळी मुंबई महापालिकेसाठी मारहाण करणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही असा टोला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी लगावला. पण आता उरणमध्ये मात्र काँग्रेससह आघाडीतील मित्र पक्षांनी भाजपला रोखण्यासाठी खेळी खेळली आहे.
उरणमध्ये मनसेसोबत नवीन समीकरण
एकीकडे काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढत असताना दुसरीकडे नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेची युती झाली आहे. उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसेची युती झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि मनसेची उरण नगरपालिकेसाठी आघाडी झाली आहे. प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील फोटो आहे.
एकट्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे उरण नगरपालिकेच्या मैदानात उतरली आहे. उरण नगरापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षाला सोबत न घेता भाजप स्वतंत्र लढणार आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार आहेत.
कालच केली होती मनसेवर टीका
काल मुंबईत एक दिवसीय शिबीर झालं. AICC चे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शिबिरानंतर काँग्रेस मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. स्थानिक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची तशी इच्छा असल्याचे ते म्हणाले. तर या बैठकीनंतर वर्षा गायकवाड यांनी मनसेवर आगपाखड केली. मारहाण करणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांच्याशी युती करणार नाही, असं कालच वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या. हिंदी भाषिकांच्या मतांना फटका बसू नये यासाठीचा काँग्रेसचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे उरण नगरपालिकेत मात्र स्थानिक नेत्यांना हे धोरण मान्य नसल्याचे समोर येत आहे. म्हणजे मुंबईबाहेर काँग्रेसला मनसेशी केलेली युती मान्य असल्याचे समोर येत आहे.