Tv9 EXCLUSIVE | हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन यांची एकी दाखवणारं पोशापिर बेट, वसईतलं ‘ते’ बेट चर्चेला कारण

| Updated on: Mar 25, 2023 | 10:50 PM

आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. इथे वेगवेगळ्या भाषेचे आणि विविध धर्मांची लोकं राहतात. आपण धर्मावरुन नेहमी राजकारण आणि वाद होताना पाहतो. पण वसईत समुद्रात असणारं एक बेट या राजकारण आणि वादाला फाटा देताना दिसतं. तिथे दिसते ती फक्त हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन धर्मांची एकी आणि तीसुद्धा लख्खपणे!

Tv9 EXCLUSIVE | हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन यांची एकी दाखवणारं पोशापिर बेट, वसईतलं ते बेट चर्चेला कारण
Follow us on

वसई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माहीम येथील दर्ग्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने कारवाई झाली. या कारवाईनंतर वसईच्या समुद्रातील पोशापिर हा दर्गाही चर्चेत आला आहे. वसई किल्लाबंदर कस्टम जेटीपासून जवळपास 2 नॉटिकल अंतरावर पोशापिर हे निर्मानुष्य बेट आहे. या बेटाचे अंदाजे क्षेत्रफळ 15750 स्क्वेअर मीटर एवढे आहे. या बेटावर मुस्लिमांचा दर्गा, हिंदूंचा पवनपुत्र हनुमानाचा पूर्ण पुतळा आणि ख्रिश्चन धर्मियांचा क्रॉस आहे. पोशापिर बेट येथे हजरत सय्यद पीर गौश आली शहा कादरी, गोशापिर बाबा (पोशापिर) यांचा दर्गा आहे.

या दर्ग्यात मस्जिद-ए-कादरी असे दिवा लावण्याकरिता पक्के बांधकाम केलेले आहे. त्याची 15 फूट लांब अशी भिंत आहे.
याच बेटाच्या टेकडीवर 1 मे 2016 पासून पवन पुत्र हनुमानाचा पूर्ण पुतळा आहे. तर बाजूला ख्रिश्चन धर्मियांचे क्रॉसचे पक्के बांधकाम केलेले आहे. तसेच त्याचठिकाणी युनियन ऑफ टेरोटरी असे इंग्रजीमध्ये लिहिलेला चौथारा आहे. तिथे एक मेरिटाईम बोर्डाने लाईट हाऊस बसविलेले आहे.

या पोशापिर बेटावर भाईंदर, उत्तन, वसई, अर्नाळा, तसेच आसपासच्या परिसरातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मीय लोक बोटीने जातात. पोशापिर हे बेट नैसर्गिक असून, या बेटावर अंदाजे 10 ते 15 वर्षांपूर्वीपासून दर्गा, हनुमानाचा पूर्ण पुतळा आणि ख्रिश्चन धर्मियांचे क्रॉसचे प्रतीक बसविले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याची अधिकृत माहिती कुणालाही सांगता येत नाही.

पोशापिर बेट हे खोल समुद्रात असल्याने तिकडे नेहमी नागरिकांना जाता येत नाही. भरती, ओहोटी याचा अंदाज घेऊन नागरिक त्याठिकाणी जातात. राज ठाकरे यांच्या सभेनंतर राज्यातील दर्ग्याचा विषय जरी ऐरणीवर आला असला तरी वसईच्या समुद्रातील पोशापिर बेट हे हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन या सर्वधर्मीयांच्या एकतेचे दर्शन घडवीत आहे. या बेटावर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या तीनही धर्माचे नागरिक आपल्या रीतिरिवाज प्रमाणे पूजा करतात. त्या कुणाचा कुणावरही आक्षेप नाही, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.