राजची साथ सोडणारे वसंत मोरे उद्धव यांची साथ धरणार…शिवसेनेच्या बड्या नेत्याकडून दुजोरा

vasant more raj thackeray and uddhav thackeray: वसंत मोरे यांनी लोकसभा निवणूक लढवली होती. त्यांचे पुण्यात सामाजिक आणि राजकीय कार्य चांगले आहे. आज दुपारी ते उद्धव ठाकरे साहेबांना भेटत आहेत हे खरे आहे. त्यानंतर लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील हे देखील तितकच खरं आहे.

राजची साथ सोडणारे वसंत मोरे उद्धव यांची साथ धरणार...शिवसेनेच्या बड्या नेत्याकडून दुजोरा
vasant more
| Updated on: Jul 04, 2024 | 1:38 PM

पुणे शहरातील चर्चेतील व्यक्तीमत्व वसंत मोरे शिवसेना उबाठामध्ये जाणार आहे. कधीकाळी राज ठाकरे यांची सोबत अनेक वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत रमणारे वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेतून बाहेर पडत वेगळी वाट निवडली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. परंतु अखेर ते डॉ.प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये दाखल झाले. वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले. त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. आता वंचितमधून बाहेर पडून ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येणार आहे. त्यासाठी गुरुवारी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. वसंत मोरे यांचा शिवसेना प्रवेशाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला.

नऊ जुलै रोजी वसंत मोरे शिवसेनेत

वसंत मोरे हे नऊ जुलैला शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. या भेटीदरम्यान पुढील राजकीय भूमिका त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितली. त्यामुळे आता 9 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वसंत मोरे शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती आहे.

काय म्हणाले संजय राऊत

वसंत मोरे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला. त्यावर संजय राऊत म्हणाले की, भेट घेऊ द्या ना. काय हरकत आहे. ते सामजिक कार्यकर्ते आहेत. एका पक्षाचे नेते आहेत. त्यांनी लोकसभा निवणूक लढवली होती. त्यांचे पुण्यात सामाजिक आणि राजकीय कार्य चांगले आहे. आज दुपारी ते उद्धव ठाकरे साहेबांना भेटत आहेत हे खरे आहे. त्यानंतर लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील हे देखील तितकच खरं आहे.

राजची साथ सोडणारे उद्धव यांच्या साथीला

संजय राऊत यांनी दिलेल्या दुजोरामुळे वसंत मोरे यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या सोबत होते. परंतु पुणे शहरातील मनसेच्या राजकारणास कंटाळून त्यांनी मनसे सोडल्याचे म्हटले होते. पक्षातील काही जणांनी राजसाहेबांना चुकीची माहिती दिल्याचे वक्तव्य वसंत मोरे यांनी पक्ष सोडताना केले होते. आता ते उद्धव ठाकरे यांच्या साथीला जाणार आहे. उद्धव आणि राज ठाकरे भाऊ-भाऊ असले तरी राजकारणात कट्टर विरोधक आहेत. यामुळे वसंत मोरे यांचा शिवसेना प्रवेश राज ठाकरे यांना झोंबणार असणार आहे.

वसंत मोरे यांनी पुण्यात कोरोना काळात मोठे काम केले होते. ते सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना ते वाचा फोडतात. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय असणाऱ्या वसंत मोरे यांना लोकसभा निवडणुकीत यश मिळाले नाही.