मुंबईत भाजपचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
मुंबईत भाजपने शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. पुढच्या काही महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली पक्ष संघटना मजबूत बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती थांबतच नाहीय. आतापर्यंत राज्यभरातील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत, भाजपात किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पुढच्या काही महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली पक्ष संघटना मजबूत बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत मुंबईतील अनेक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबई एकवेळ शिवसेनेचा बालेकिल्ला होती. पण पक्षफुटीनंतर आता दोन गटात विभागणी झाली आहे. शिवसेनेची मुंबईत ताकद फक्त कार्यकर्ता स्तरावरच नाही, तर अनेक हॉटेल, कंपन्यांमध्ये यूनियन आहे. भाजपने आता ठाकरे गटाला युनियनच्या आघाडीवर कमकुवत बनवण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून पक्ष संघटना बांधणीचे काम हाती घेण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटातून आउटगोइंग थांबण्याचं नाव घेत नाहीय. आज मुंबईच्या विलेपार्ले पूर्वेकडील जिंजर हॉटेल मधील भारतीय कामगार सेनेच्या सर्वच कामगारांनी शिवबंधन तोडून भारतीय जनता पक्षाच्या अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेत प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो कर्मचाऱ्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी चव्हाण यांच्या हस्ते कामगार संघटनेच्या नवीन फलकाचे देखील उद्घाटन करण्यात आले.
रविंद्र चव्हाण यांनी काय सूतोवाच केलं?
यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, “काही संघटनांची इथे मोनोपोली चालत होती. मात्र आता कामगारांचे हित भारतीय जनता पक्षच साधू शकतो हे लक्षात आल्यानंतर शेकडो कामगारांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे” शिवाय लवकरच अन्य हॉटेलमधील देखील कामगार भाजपात प्रवेश करतील असे सुतोवाच चव्हाण यांनी यावेळी केलं.
महाराष्ट्रात पूरस्थिती
महाराष्ट्रात सध्या मराठवाडा, सोलापूर या भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. मराठवड्यात पिकांसह शेत जमीन वाहून गेल्याची स्थिती आहे.
