आम्हाला देवाकडून….विशाल गवळी आत्महत्याप्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, केली ही मोठी मागणी

Vishal Gawali Case : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आणि तिची निर्घृण हत्या करणारा आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहात आत्महत्या केली. प्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांनी मोठी मागणी केली आहे.

आम्हाला देवाकडून....विशाल गवळी आत्महत्याप्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, केली ही मोठी मागणी
विशाल गवळी आत्महत्या
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 13, 2025 | 12:09 PM

कल्याणमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर नराधम विशाल गवळी याने लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर त्याने तिची निर्घृण हत्या केली होती. आरोपी विशाल गवळी याची रवानगी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. त्याने तुरूंगातील कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया आली आहे. पीडितेच्या वडिलांनी याप्रकरणी एक मोठी मागणी पोलीस आणि राज्य सरकारकडे केली आहे.

पहाटे संपवले नराधमाने जीवन

विशाल गवळी तळोजा कारागृहात होता. तळोजा कारागृहात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याने शौचालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समजते. या घटनेमुळे कारागृहात एकच खळबळ उडाली. तुरुंग प्रशासन या घटनेने खडबडून जागे झाले. विशाल गवळी हा कल्याणमधील कुप्रसिद्ध गुंड होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न, छेड काढणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण असे गुन्हे दाखल होते.

हा तर देवाचा न्याय

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला देवाकडे न्याय मिळाल्याची पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली. विशाल गवळीच्या दोन भावांना देखील कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांकडे त्यांनी या दोघांवर कारवाईची मागणी केली आहे. हे दोघे परिसरात दहशत निर्माण करत असून आम्हाला त्यांची भीती वाटत आहे, असे पीडितेचे वडील म्हणाले. पीडित कुटुंबाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. आम्हाला देवाकडे मिळालेला हा न्यायच आहे, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे.

विशाल गवळी सराईत गुंड

विशाल गवळी हा सराईत गुंड होता. त्याने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कल्याण येथील कोळसेवाडी परिसरातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून स्वत:-च्या घरी आणले होते. घरात त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर त्या मुलीची घरातच हत्या केली होती. मुलीचा मृतदेह बापगाव परिसरात फेकून दिला होता. त्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो शेगाव येथे लपून बसला होता. शेगाव पोलिसांनी सापळा रचत त्याला शिवाजी चौकातील एका सलूनमधून ताब्यात घेतले होते.

विशाल गवळीची तीन लग्न झाली होती. त्याच्या स्वभावाला कंटाळून दोन बायका त्याला सोडून गेल्या होत्या. त्याची तिसरी बायको ही एका खासगी बँकेत नोकरीला होती. या तिसऱ्या पत्नीने अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी विशाल याला मदत केल्याची माहिती तपासात समोर आली होती. दोघांनी एका रिक्षातून अल्पवयीन मुलीचा मृतदेह बापगाव परिसरात फेकून दिला होता.