कोण कुणाला संपवतंय? कोण कुणाच्याविरोधात आरोप करतंय? शिवसेनेतल्या भूकंप केंद्राचे सगळे धागेदोरे समजून घ्या

| Updated on: Oct 02, 2021 | 6:09 PM

शिवसेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम अचानक पुन्हा प्रकाश झोतात आले आहेत. कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने ते चर्चेत आले आहेत.

कोण कुणाला संपवतंय? कोण कुणाच्याविरोधात आरोप करतंय? शिवसेनेतल्या भूकंप केंद्राचे सगळे धागेदोरे समजून घ्या
ramdas kadam
Follow us on

मुंबई: शिवसेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम अचानक पुन्हा प्रकाश झोतात आले आहेत. कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने ते चर्चेत आले आहेत. कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्यांकडे रसद पुरवल्याचं या क्लिपमधून स्पष्ट दिसत आहे. कदम यांनी हे आरोप फेटाळले आहे. मात्र, शिवसेनेत कोण कुणाला संपवतंय आणि कोण कुणाच्या विरोधात आरोप करतंय हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रकरण काय आहे?

रामदास कदम आणि प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तिच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. प्रसाद कर्वे हे कदम यांचे पीए असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कदम यांनी प्रसाद कर्वे माझा कधीच पीए नव्हता आणि माझे व त्याचे काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या कथित क्लिपमधून कदम हे कर्वेंना सोमय्यांना आपल्याकडे घेऊन येण्यास सांगताना दिसत आहेत. तसेच अनिल परब यांच्या विरोधात झालेल्या कारवायांची माहितीही ते वारंवार घेताना दिसत आहेत. तसेच परब यांच्या कार्यालयावर हातोडा पडणार असल्याचा आनंद व्यक्त करतानाही कदम दिसत असल्याचं या कथित क्लिपमधून दिसून येत आहे.

रामदास कदम यांचं म्हणणं काय

विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील माझ्या आवाजाच्या ऑडिओ क्लीप बनवून व्हायरल करण्यात आल्या होत्या. त्या ऑडिओ क्लीपमध्ये मी मुस्लिम समुदायाला शिवीगाळ करत असल्याचा दावा करण्यात आला होता. गेल्या दोन महिन्यांमध्ये दहावेळा या विषयावर पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी मी अब्रुनुकसानीचा दावा टाकलेला आहे. प्रसाद कर्वेसोबत माझा कुठलाही संबंध नाही. किरीट सोमय्यांशी माझा कुठलाही संबंध नाही. उलटपक्षी जो मुलगा आहे तो वैभव खेडेकरांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. त्या दोघांनी मिळून हे केलं की काय? असं मला वाटत आहे. अनिल परब यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मी शिवसेनेचा नेता आहे. त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. माझा मुलगा तिथे आमदार आहे. संजय कदम यांना पाडून तो आमदार बनलेला आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो. हे पाप आहे. ते माझ्या हातून घडणार नाही. खोट्या क्लीप व्हायरल करुन मला बदनाम करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले होते. रामदास कदम बोलल्यानंतर मोठी प्रसिद्धी मिळते.

याच्याआधीही माझी बदनामी झाल्याचा दावा मी ठोकलाय. आता पुन्हा मी न्यायालयात जाणार आहे. किरीट सोमय्या यांच्याशी आमचा दुरान्वयेही संबंध नाही. मी पाठीत खंजीर खुपसणारा नाही. विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील अशा क्लीप व्हायरल करुन बदनाम केलं गेलंय. मी दोनदा पत्रकार परिषदा घेऊन मंत्रीपद स्वीकारणार नाही, असं जाहीर केलं होतं. माझी कोणतीही नाराजी नाही. खोट्या क्लीप बनवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणावरुन मी कदाचित एक-दोन दिवसात उद्धव ठाकरे यांना भेटू, असं रामदास कदम म्हणाले.

सोमय्यांचं थोबाडही पाहिलं नाही

अनिल परब यांचा जो रिसॉर्ट आहे. त्याची तक्रार किरीट सोमय्यांकडे मी केली, असं खेडेकर यांचं म्हणणं आहे. खेडेकरांचं हे म्हणणं हस्यास्पद आहे. गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाड पाहिलं नाही. भेटणं तर लांबच झालं. सोमय्यांना टीव्हीवर कधी तरी पाहतो. मी समोरून अंगावर जाणारा माणूस आहे. मी कधी कुणाच्या पाठित खंजीर खुपसला नाही हे सर्व महाराष्ट्र जाणून आहे. मी अनिल परबच्या हॉटेलची तक्रार का करणार? तसं केल्यानं काय साध्य होणार आहे? अनिल परब हे माझ्या पक्षाचे मंत्री आहेत. याचं मला भान आहे. मी कडवा शिवसैनिक आहे, असं कदम म्हणाले.

खेडेकर हादरले म्हणून आरोप

रत्नागिरी परिषदेतील खेडचे क वर्ग नगरपालिकेतील नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची पुष्कळशी प्रकरणं मी माहितीच्या अधिकारातून काढली. आमच्या नऊ नगरसेवकांनी त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. जिल्ह्याधिकाऱ्यांनी सर्व प्रस्तावाची शहानिशा केली, सुनावणी घेतली आणि हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. खेडेकर हे कोर्टात गेले होते. न्यायालयामधून त्यांनी चार आठवड्याची स्थिगिती घेतली. त्यानंतर ते प्रचंड बिथरले. त्यांनी माझ्यावर निखालस खोटे, चुकीचे आणि दिशाभूल करणारे आरोप केले, असा दावा कदम यांनी केला आहे.

kirit & karve 1

वर्चस्वाची लढाई?

नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेने रामदास कदम यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर फडणवीस सरकारमध्ये कदम यांच्याकडे पर्यावरण मंत्रीपदाचीही जबाबदारी दिली होती. मात्र, या कालखंडात रामदास कदम यांना स्वत:चा विधानसभा मतदारसंघ तयार करता आला नाही. आता राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात रामदास कदम यांना मोठं खातं मिळेल असं म्हटलं जात होतं. मात्र, कदम यांना या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली नाही. दुसरीकडे विधानस परिषदेतील आमदार अनिल परब यांना मंत्रिमंडळात संधी देऊन चांगलं खातंही देण्यात आलं. त्यामुळे परब यांच्या रुपाने कोकणात शिवसेनेचं नवं नेतृत्व उदयाला आलं. शिवाय परब हे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यांच्या शब्दाला मातोश्रीत किंमत आहे. त्यामुळेच शिवसेनेत वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याने त्यातूनच हे प्रकरण घडलं असावं, असं सूत्रांनी सांगितलं.

CLIP KARVE TO RAMDAS MSEB PARAB

विरोधकांनी घरचेभेदी हेरले?

राज्यात सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला सत्ता आणता आली नाही. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळेच भाजपचे नेते राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत असून आघाडीच्या नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. शिवसेनेतही काही नेते नाराज असल्याने त्यांच्यावरही भाजपचे नेते नजर ठेवून होते. कदम-कर्वे क्लिप आणि त्यातील सोमय्यांचा संदर्भ ही त्याच नाराजीची कडी असावी, असं राजकीय सूत्रांनी सांगितलं. शिवसेनेच्याच नेत्यांकडून शिवसेनेच्याच नेत्यांची माहिती घेऊन विरोधक पोलखोल करत असल्याचंही राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.

WhatsApp Audio 2021-10-02 at 4.05.43 PM(3)

संबंधित बातम्या:

रामदास कदम यांच्या तीन ऑडिओ क्लिप व्हायरल; शिवसेनेत खळबळ; वाचा, संभाषण जसेच्या तसे

शिवसेनेत भूकंप? परबांच्याविरोधात ईडीची कारवाई, रामदास कदम म्हणतात, वाहवा वाहवा, ऑडिओ क्लिप व्हायरल

तर देवेंद्र फडणवीसांना शाब्बासकी मिळेल, नाना पटोलेंचा टोला

(what is political aspects behind shiv sena leader ramdas kadam viral audio clip)