अकोल्यात जात पंचायतीकडून महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा; नीलम गोऱ्हेंची गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

| Updated on: May 12, 2021 | 6:29 PM

अकोल्यात जात पंचायतीने एका महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे. (Woman made to spit & lick during Panchayat session in Akola)

अकोल्यात जात पंचायतीकडून महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा; नीलम गोऱ्हेंची गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी
nilam gorhe
Follow us on

मुंबई: अकोल्यात जात पंचायतीने एका महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे. त्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Woman made to spit & lick during Panchayat session in Akola)

नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन देऊन ही मागणी करतानाच या घटनेची माहितीही दिली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील वडगाव येथे ही घटना घडली आहे. पीडीत महिला जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील रहिवासी आहे. पीडित महिलेने साईनाथ नागो बाबर यांच्याशी 2011 साली विवाह केला होता. पतीच्या जाचाला कंटाळून तिने 2015 मध्ये न्यायालयातून रितसर घटस्फोट घेतला. पीडीत महिलेने न्यायालयात जाणे तिच्या नाथजोगी जात पंचायतच्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फोट धुडकावून लावला. दरम्यान पीडीत महिलेने 2019 मध्ये अनिल जगन बोडखे या घटस्फोटीत व्यक्तीशी पुनर्विवाह केला. असा पुनर्विवाह पंचांनी अमान्य केला व जात पंचायतने तिला 1 लाख रुपयांचा दंड केला. महाराष्ट्रातील पंचांनी एकत्र येऊन न्यायनिवाडा करत दारू मटण खाल्ले व पीडीत परिवारास जात बहिष्कृत केले. पीडीत महिलेने पहिल्या नवर्‍या सोबत रहावे, असा पंचांनी हेका कायम ठेवला. तसेच 9 एप्रिल 2012 रोजी पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे व त्या महिलेने ते चाटायचे अशी शिक्षा पीडित महिलेला देऊन विकृतीचे दर्शन घडविले. अशा घटनांना सातत्याने घडत असल्याने कठोरपणे कार्यवाही आणि जातपंचायत कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटलं आहे.

जात पंचायतीचे प्रश्न प्रलंबित

जात पंचायतीचे बरेच प्रलंबित प्रश्न आहेत. घटना घडल्यानंतर प्रथमतः तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब होतो आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे माहिती मिळताच पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करण्याकरिता प्रयत्न करावा. तसेच या प्रकरणात संबंधितांवर ताबडतोब कारवाई करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

दर पंधरा दिवसाला आढावा घ्या

अशी घटना नोंद झाल्यानंतर तक्रार नागरी हक्क सरंक्षण कक्षाकडे ताबडतोब देऊन पुढील कार्यवाही जलद गतीने होण्यासाठी वेळेचे निर्बंध घालून देण्यात यावे. जात पंचायतीच्या केसेचा आढावा PCR नागरी हक्क संरक्षण पोलीस महानिरीक्षक यांनी दर पंधरा दिवसाला घेतला तर अशा घटना आटोक्यात आणण्यासाठी नक्कीच फायदा होईल. पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सर्व जात पंचायतीच्या पंचांची माहिती गोळा कडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात यावी. वरील मुद्द्यांवर त्वरित कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Woman made to spit & lick during Panchayat session in Akola)

 

संबंधित बातम्या:

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मोठा दिलासा, गोंदियातील बदलीला स्थगिती

कुख्यात गुंडांची टोळी, कमी किंमतीत सोनं देतो सांगून नकली नाणे द्यायचे, पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, जंगलात थरार

कोरोनाच्या लस कधी मिळणार? किती मिळणार?; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अखेर मौन सोडलं

(Woman made to spit & lick during Panchayat session in Akola)