बिल्डर, मर्सिडीज, मराठी माणसं बेघर… रामदास कदम यांच्या प्रश्नाला अनिल परब यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले, तुमचा मुलगा गृहराज्यमंत्री आहे ना? मग…

Anil Parab big challenge : उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर मोठा आरोप केला आहे. त्याचवेळी रडता कशाला, आपली पुन्हा एकदा चौकशी करा असे खुले आव्हान त्यांनी कदम पिता-पुत्रांना दिले.

बिल्डर, मर्सिडीज, मराठी माणसं बेघर... रामदास कदम यांच्या प्रश्नाला अनिल परब यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले, तुमचा मुलगा गृहराज्यमंत्री आहे ना? मग...
अनिल परब
| Updated on: Oct 09, 2025 | 1:29 PM

उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर घणाघाती आरोप केले. पुण्यातील गुंड संस्कृतीवर त्यांनी ताशेरे ओढले. तर निलेश धायवड यांच्यासह इतर गुंड टोळ्यांमुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे ते म्हणाले. या गुंडांना कुणाचा आश्रय आहे, असा सवाल त्यांनी केला. त्याचवेळी रडता कशाला, आपली पुन्हा एकदा चौकशी करा असे खुले आव्हान त्यांनी कदम पिता-पुत्रांना दिले.

माझी पुन्हा ईडी चौकशी करा

रामदास कदम यांची अक्कल किती आहे, ती त्या दिवशी दिसली. त्यांनी जे शपथपत्र दिलं ते माझ्या इलेक्शनचं शपथपत्र आहे. त्यात मी गाड्या कशा घेतल्या त्याचा उल्लेख आहे. एखाद्या बिल्डरने गाडी दिली असेल तर मी शपथपत्रात लिहू शकतो का. माझं तर साधं मत आहे. सरकार त्यांचं आहे. त्यांचा मुलगा गृहराज्यमंत्री आहे. चौकशी करा ना. माझ्याकडे गाड्या कुठून आल्या त्या. दोन मर्सिडीज आहेत. माझा धंदा आहे. त्यावर मी काय करू शकतो. ईडी आणि इन्कम टॅक्सने चौकशी केली आहे. रामदास कदम कोण आहे मला विचारणारा, असा सवाल अनिल परब यांनी केला. मला विचारण्याचा अधिकार ईडी आणि इन्कम टॅक्सला आहे. माझ्या चौकशीचा अहवाल काढा. पुन्हा ईडी चौकशी करा, असे आवाहन त्यांनी कदमांना दिले.

सीबीआयची चौकशी मागावी. चौकशी व्हावी. माझ्यावर जे आरोप आहेत. ते इलेक्शन अॅफिडेव्हिट वाचलंय. मुलगा होम मिनिस्टर आहे. रडता कशाला. चौकशी करा. घर खाली केली म्हणतात, तिथे जाऊन विचारा. मी तिथे कधी गेलो का. ८ हजार लोकांना बेघर केलं. तिथे तेवढी वस्ती तरी आहे का. त्यांना कोण माहिती पुरवतं हे माहीत आहे, असा चिमटा त्यांनी कदमांना काढला.

मुख्यमंत्र्यांना सांगतो वेळीच कारवाई करा -अनिल परब

मी पर्सनल टीका केली नाही. त्यांच्या मुलाने मंत्री म्हणून वाळू चोरली, ही पर्सनल टीका आहे. गृहराज्यमंत्र्याच्या आईच्या नावाने डान्सबार चालतो. मुली नाचवल्या जातात. तीनदा रेड होते. त्याचा एफआयआर आहे. ही पर्सनल टीका आहे? असा सवाल नेते अनिल परब यांनी केला. त्यांच्या पत्नीच्या जळीत प्रकरणात मी चौकशीची मागणी केली. त्यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. तशीच माझी मागणी आहे. त्यांना बाळासाहेबांचं मृत्यू प्रकरण जाणून घेण्याची इच्छा आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या जळीत प्रकरणाची माहिती जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. त्यात पर्सनल काय? बाजूला बसून पत्नीला किती दम दिला असेल माहीत नाही. बाजूला बसून दम दिला म्हणून गोष्ट सिद्ध होत नाही. ती कोर्टात सिद्ध झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना सांगतो वेळीच कारवाई करा. कोर्टाचे ताशेरे आल्यानंतर कारवाई करण्यात अर्थ नाही, असा इशारा परब यांनी दिला.