AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार अपात्रतेच्या निकालाच्या 7 दिवसआधी आदित्य ठाकरेंचं महाराष्ट्राला पत्र, पत्रात नेमकं काय म्हटलंय?

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर येत्या 10 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राला पत्र लिहिलं आहे. "सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने लढणाऱ्यांना ह्या हुकूमशाहीत त्रास दिला जाईल, अडचणीत आणलं जाईल, पण हा लढा जर आपण मिळून लढलो तर अंतिम विजय सत्याचाच आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आमदार अपात्रतेच्या निकालाच्या 7 दिवसआधी आदित्य ठाकरेंचं महाराष्ट्राला पत्र, पत्रात नेमकं काय म्हटलंय?
| Updated on: Jan 03, 2024 | 3:34 PM
Share

निवृत्ती बाबर, Tv9 मराठी, मुंबई | 3 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल येत्या 10 जानेवारीला जाहीर होणार आहे. या निकालावर महाराष्ट्राच्या राजकारणातील आगामी काळातील घडामोडी अवलंबून आहेत. हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. पण त्याउलट निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडून येईल. अर्थात ते आगामी काळात स्पष्ट होईलच, पण या निकालाच्या 7 दिवस आधीच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मरहाराष्ट्राच्या जनतेला विविध विषयांच्या मुद्द्यावरुन महत्त्वाचं आवाहन केलं. त्यांनी आपल्या पत्रात काही घटनांचा उल्लेख करत शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला. तसेच तुमचं मत मौल्यवान आहे आणि या मतावर भविष्य अवलंबून आहे. सोबत लढलो तर सत्याचा विजय होईल, असं आदित्य ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

“माझ्या प्रिय महाराष्ट्रवासीयांनो, हे आपलं वर्ष आहे! आपण हे वर्ष फक्त आपल्यासाठी नाही, तर आपल्या देशासाठी समर्पित करायला हवं! भारताच्या लोकशाही मूल्यांचं आणि संविधानाचं कायदेशीर बाबींचाच वापर करून खच्चीकरण केलं जाताना दिसत आहे. जगभरात जिथे जिथे लोकशाही संपुष्टात आली, तिथे ती संपवण्यासाठी अश्याच संस्थांचा वापर केला गेला होता. ज्या खरंतर लोकशाहीच्या रक्षणासाठी अस्तित्वात आल्या होत्या. लोकशाही संपवून हुकूमशाही निर्माण झालेल्या ठिकाणी आजपर्यंत सामान्य लोकांच्या भल्यासाठी काहीही झालेले नाही. जे काही केले गेले ते केवळ काही मोजक्या लोकांसाठी, तुमच्या-माझ्या सारख्या १.३ अब्ज लोकांसाठी तर नक्कीच नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

‘लोकशाही अस्तित्वात आणणं हेच आपलं ध्येय’

“आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर, पुन्हा लोकशाही अस्तित्वात आणणं हेच आपलं ध्येय आहे. २०२२ च्या मध्यात गद्दारांच्या टोळीने आपल्या ह्या शांतीप्रिय आणि प्रगतशील महाराष्ट्राचं रूपांतर ‘बिल्डर्स आणि कंत्राटदार’ मिळून चालवत असलेल्याला एका बेकायदेशीर राजवटीत केलं आणि आता, खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आपली शहरं उद्ध्वस्त होत आहेत. रस्ते, विकास योजनांमध्ये घोटाळे होत आहेत. उद्यानं गिळंकृत केली जात आहेत. इतकंच नाही तर, रस्त्यावरील फर्निचर, सॅनिटरी पॅड्स ह्यांच्या बाबतीतही घोटाळे होत आहेत. आणि हे तर केवळ भ्रष्ट कारभाराचं वरवरचं टोक आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी पत्रात केली.

‘ग्रामीण भागातल्या अडचणी टोकाच्या भीषण’

“ग्रामीण भागातल्या अडचणी तर टोकाच्या भीषण होत आहेत. शेतकरी आत्महत्या वाढतच चालल्या आहेत. सततच्या हवामान बदलाला आणि त्यामुळे अदवणाऱ्या आपत्तींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना मूलभूत नुकसान भरपाईचीही मदत केली जात नाहीये. त्यांना धीर द्यायला देखील सरकारकडून कोणीही जात नाही. खोके सरकार फक्त बॅनर्सवर दिसतं. हे खरोखरच भयावह आहे. एकीकडे शहरं लुटली जात आहेत, दुसरीकडे ग्रामीण भागाला कुठलीच मदत मिळत नाहीये आणि गुन्हेगार मात्र मोकाट सुटले आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

‘बंदूकीचा धाक दाखवून घाबरवणाऱ्या माणसाला अध्यक्ष केलं जातं?’

“एका आमदाराचा मुलगा एका व्यावसायिकाचं अपहरण करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला, परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई केली गेलेली नाही. आणखी एक आमदार गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखताना कॅमेऱ्यात पकडला गेला आणि त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची बातमीही आपण ऐकली. पण त्याच आमदाराला त्याच्या ह्या उद्दामपणाचं कौतुक म्हणून, आता सिद्धिविनायक गणेश मंदिर ट्रस्टचं अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. एका हिंदू सणात, बंदूकीचा धाक दाखवून घाबरवणाऱ्या माणसाला अध्यक्ष केलं जातं? हे हिंदुत्व तुम्ही-आम्ही, आपण स्वीकारणार आहोत का?”, असा सवाल आदितय ठाकरेंनी केला

‘पायाभूत सुविधा अनेक महिन्यांपासून उ‌द्घाटनाच्या प्रतीक्षेत’

“काही कॅबिनेट मंत्र्यांनी महिला खासदारांना शिवीगाळ केली, काही आमदार फोनवर अधिकाऱ्याला धमकावताना रेकॉर्ड झाले आहेत, परंतु ह्या सर्व कृत्यांसाठी त्यांना बक्षीस म्हणून बढती देण्यात आली आहे. मागच्या २ वर्षात, आपल्या राज्यात २ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकणारे उद्योग, राजवटीच्या लाडक्या राज्यात पळवले गेले. नैसर्गिकरित्या त्यांनी नक्कीच महाराष्ट्राची निवड केली असती, पण त्यांना जबरदस्तीने दूर नेले गेले. देशभरातून अनेक लोक उदरनिर्वाहाची स्वप्नं घेऊन आपल्या राज्यात येतात. पण आपल्या राज्याला आणि ह्या लोकांना मात्र ह्या स्वप्नापासून दूर नेलं जात आहे. प्रदूषण, भ्रष्टाचार, गलथान कारभार, ढासळत चाललेल्या पायाभूत सुविधा, सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा अभाव, महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची भीषण अवस्था ह्यांसारख्या अनेक समस्यांना आपण तोंड देत आहोत. एम.टी.एच.एल. आणि दिघा रेल्वे स्थानकासारख्या पायाभूत सुविधा अनेक महिन्यांपासून उ‌द्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत”, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

‘सत्य हे आहे की…’

“ह्या सर्व मूळ समस्या लपवण्यासाठी, आत्ताच्या राजवटीने आपल्याला सततच्या धार्मिक/ जातीय दंगली, नागरी अशांतता आणि टीव्ही वादविवादांमध्ये व्यस्त ठेवलं आहे. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि इतर समस्यांकडून लक्ष वळवण्यासाठी आपल्याला जाणून बुजून कार्यक्रमांमध्ये गुंतवून ठेवलं जातंय, मूळ मुद्द्यांपासून भरकटवलं जातंय. आता आपण ठरवायला हवं की आपल्याला आपल्या राज्यासाठी, शहरासाठी, आपल्या शेतीसाठी, आपल्या परिसरासाठी आणि आपल्या स्वतःसाठी काय हवंय? मी हे नेहमीच सांगत आलोय, ‘जी माणसं वर्तमान आणि भविष्याचा विकास करण्यासाठी काहीच करू शकत नाहीत, ती भूतकाळातल्या वादात आपल्याला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात.’ सत्य हे आहे की, आपल्या भूतकाळाबद्दलच्या भांडणावर त्यांचं ‘भविष्य’ अवलंबून आहे. पण आपलं भविष्य, आपण आपल्या उद्यासाठी काय करणार आहोत ह्यावर अवलंबून आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

‘ह्या हुकूमशाहीत त्रास दिला जाईल, अडचणीत आणलं जाईल…’

“ज्यांनी लोभापायी स्वतःला विकलं, जे उद्या आपलं भविष्य विकायलाही मागेपुढे बघणार नाही अशा गद्दारांच्या राजवटीत तुमच्या मुलांची प्रगती, तुमची प्रगती होईल, असं तुम्हाला खरंच वाटतं का? महाराष्ट्राचा अभिमान, वैभव लुटण्याचा प्रयत्न ही ‘महाराष्ट्रविरोधी राजवट’ करत आहे, अशा राजवटीत तुमचं उज्ज्वल भविष्य घडू शकेल असं तुम्हाला वाटतं का? त्याहून महत्वाचं म्हणजे, लोकशाही व्यवस्थेवर चालणारं राज्य म्हणून नावाजलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात, हे आता लोकशाही असल्याचं ढोंगही करत नाहीत. अशा राजवटीत तुम्ही रहायला तयार आहात का? हे वर्ष आपल्यासाठी केवळ विचार करायचं नाही, तर कृती करण्याचं वर्ष आहे! ही कृती म्हणजे तुमचं ‘मत’! तुमचं मत हे तुमचं भविष्य… आपलं भविष्य आहे! हे भारताबद्दल आहे! हे महाराष्ट्राबद्दल आहे ! आणि हे ह्या महान राष्ट्राच्या नागरिकांबद्दल आहे. तुमचं आजचं मत तुमच्या भविष्यासाठी मौल्यवान आहे. सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने लढणाऱ्यांना ह्या हुकूमशाहीत त्रास दिला जाईल, अडचणीत आणलं जाईल, पण हा लढा जर आपण मिळून लढलो तर अंतिम विजय सत्याचाच आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल.
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत.
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!.
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं.
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य.
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल.
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य.
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल.
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! राऊतांचं मोठं विधान
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! राऊतांचं मोठं विधान.
आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला! राऊतांचा दावा
आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला! राऊतांचा दावा.