
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका अलिकडेच पार पडल्या असून त्याचे निकाल हाती आले आहेत. भाजपने या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. निकालानंतर आता महापौर कोण होणार याची चर्चा सुरू आहे. काही महापालिकांच्या निकालामुळे पेच निर्माण झाला आहे. युती आणि आघाडी करून हा पेच सोडवणे गरजेचे आहे. राज्यातील वेगवेगळ्या महापालिकांमधील चित्र पाहता, भाजप आणि उद्धव ठाकरेंची युती होण्याची शक्यता आहे. तसेच एका महापालिकेत काँग्रेस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आणि दुसऱ्या शिंदे वंचित सोबत हातमिळवणी करत असल्याचे चित्र समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जो आमचा महापौर करेल आम्ही त्याच्यासोबत जायला तयार असल्याचे विधान शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी केले आहे. आता चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेना उबाठा यांच्यात बैठक झाली असल्याची माहिती दिली आहे. शिवसेनेच्या या ऑफरमुळे काँग्रेसवर दबाव वाढू शकतो. शिवसेना उबाठा भाजपसोबत गेल्यास काँग्रेसचा हाता-तोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजप शिवसेना उबाठाला महापौर पद देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोल्हापूरात काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांनी याबाबत बोलताना पडद्यामागे महत्त्वाची काय सुरू असल्याची माहिती दिली आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे 34 आणि शिंदेंचे 15 नगरसेवक एकत्र आल्यावर सत्ता स्थापन करणे शक्य असल्याने या युतीबाबत आता बैठकांना वेग आला आहे.
उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी कडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ हे 40 वर गेले आहे तर भाजपकडे 37 नगरसेवक आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका सुरेखा सोनवणे आणि विकास खरात यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेला पाठिंबा देत पत्र सुपूर्द केले आहे. त्यामुळे शिंदेचा महापौर झाल्यास उपमहापौर वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.
मालेगावात एमआयएमकडून मोठी राजकीय हालचाल सुरू आहे. एमआयएमने इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची तयारी केली आहे. जातीयवादी पक्ष व शक्तींना रोखण्यासाठी ही युती होण्याची शक्यता आहे. सेना-भाजपसोबत सत्ता स्थापन करणार नसल्याचे एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शहरहितासाठी इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी व काँग्रेससोबत युती करण्याचे संकेत मुफ्ती इस्माईल यांनी दिले आहे.
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी महापौर पदावरून आता शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र सत्ता समीकरणांची मांडणी सुरू असल्याने राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे. येथे भाजपाचे 50 आणि शिवसेना (शिंदे गट) चे 53 असे मिळून एकूण 103 महायुतीचे नगरसेवक निवडून आले आहेत. संख्याबळ असूनही महापौर पदावरून शिवसेना आणि भाजपमधील तणाव कायम असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांकडून स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असून, उद्धव ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसकडून समर्थन मिळवण्यासाठी गुप्त प्रयत्न केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचदरम्यान शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटातील चार ते पाच नगरसेवक संपर्कात असल्याचीही चर्चा रंगली आहे.