नातवाने रंग उडवताच सख्ख्या आजीने जे केलं ते शत्रूही करणार नाही; महाराष्ट्रातील धक्कादायक घटनेचा CCTV
नागपूरच्या कोराडीत रंगाचा थेंब अंगावर पडल्याच्या रागातून आजीने ४ वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चिमुरडा ४५ टक्के भाजला आहे.
रंगांचा सण असलेल्या होळीच्या उत्साहात नागपूरच्या कोराडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. खेळताना अंगावर पिचकारीने रंग उडवल्याच्या क्षुल्लक कारणावरून सख्ख्या आजीने आपल्या ४ वर्षांच्या निष्पाप नातवावर उकळते पाणी ओतल्याचे घटना घडली आहे. या घटनेत चिमुरडा गंभीररीत्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणाचा एक सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या कोराडी परिसरात राहणारा ओम हरीश वांगे (४) हा धुळवडीच्या दिवशी घराबाहेर रंग खेळण्याचा आनंद घेत होता. त्यावेळी तो आपल्या पिचकारीत पाणी, रंग भरुन अंगावर उडवण्याचा आनंद घेत होता. याच वेळी त्याची नानी (आजी) सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडांवर गरम केलेले पाणी बादलीत भरून घेऊन जात होत्या. यावेळी खेळण्याच्या ओघात ओमने पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर उडवला.
हा रंग अंगावर पडताच आजीचा संयम सुटला. संतापलेल्या सिंधू ठाकरेंनी हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट ओमच्या अंगावर टाकली. उकळते पाणी अंगावर पडताच चिमुरडा वेदनेने विव्हळू लागला. तो जोरजोरात ओरडू लागला आणि रडू लागला. ही संपूर्ण हृदयद्रावक घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आजीचे हे क्रूर कृत्य स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
चिमुरड्याची प्रकृती चिंताजनक
उकळते पाणी अंगावर पडल्यामुळे ओमचा कमरेखालचा भाग गंभीररीत्या भाजला गेला आहे. मुलाचा आरडाओरडा ऐकून स्थानिक लोक मदतीसाठी धावले. त्यांनी तातडीने ओमच्या अंगावर थंड पाणी टाकले. मात्र, प्राथमिक माहितीनुसार ओम सुमारे ४५ टक्के भाजला असल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओमचे वडील वेकोलीमध्ये (WCL) कार्यरत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. आपल्याच नातवावर इतका भीषण हल्ला करणाऱ्या आजीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू

