नागपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस! मंत्र्यांच्या बंगल्याच्या सुरक्षेसाठी कायदा धाब्यावर? नेमकं काय घडलं?
नागपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपुरात मंत्र्यांच्या बंगल्याच्या सुरक्षेसाठी कायदा धाब्यावर बसवला जात असल्याचं समोर आलं आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं?

नागपुरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरात चक्क झाडावर खिळे ठोकून सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे समोर आलं आहे. खरंतर हिवाळी अधिवेशनात मुक्कामाने राहणार्या मंत्र्यांच्या बंगल्याच्या सुरक्षेसाठी रविभवन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. परंतु हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी झाडांवर खिळे ठोकण्यात आल्याचा प्रकार घडलाय. या प्रकाराने वृक्षप्रेमींकडून एकच संताप व्यक्त केला जात आहे.
नागपुरात हिवाळी अधिवेशन आयोजित केलं जाणार आहे. राज्य सरकारकडून हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ठरला आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदार, लोकप्रतिनिधी नागपुरात मुक्काम ठोकणार आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर काही तरुणांनी हल्ला केला होता. त्यामुळे राज्यातील सर्वच मंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात मुक्कामाने राहणाऱ्या मंत्र्यांच्या बंगल्याच्या सुरक्षेसाठी रविभवन परिसरात ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पण यातील २० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे झाडांच्या फांद्यांना खिळे आणि स्क्रू ठोकून लावलेले आहेत.
महाराष्ट्र झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम, १९७५ नुसार झाडांच्या खोडाला खिळे ठोकणे, झाडांच्या खोडाभोवती विद्युत माळा, केबल किंवा वायर गुंडाळणे किंवा त्यांना इजा पोहोवणे बेकायदेशीरपणे आहे. तरिही नागपुरातील रवि भवन परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या सुरक्षेसाठी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे चक्क झांडवर खिळे ठोकून लावले आहे. खिळे ठेवल्याने झाडांच्या आरोग्याला ईजा पोहोचते, असं असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने चक्क खिळे ठोकून झाडांवर सीसीटीव्ही कॅमेरे लटकवले आहे. झाडांवर चक्क खिळे ठोकल्याने कायदा धाब्यावर बसवला जात असल्याची टीका वृक्षप्रेमींकडून केला जात आहे.
काय आहे नियम?
दरम्यान, झाडांवर खिळे ठोकल्याने कायदेशीर, दंडनीय कारवाई देखील केली जाते. पहिल्या उल्लंघनासाठी प्रत्येक झाडामागे एक हजार रुपये, दुसऱ्या उल्लंघनासाठी ३ हजार रुपये दंड म्हणून आकारले जातात. तर तिसऱ्या उल्लंघनासाठी पाच हजार रुपये दंड आकारला जातो. तर चौथ्यांदा नियमभंग झाल्यास संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील कलम २१(१) अंतर्गत कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचा अधिकार मिळतो.