जमीन खोदली, सापडला विद्रूप सांगाडा, धाब्यावर घडलं असं काही की पोलीसही हादरले; भयानक घटनेनं खळबळ!

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या आचाऱ्याचा मृतदेह सहा महिन्यांनंतर पोलिसांनी खोदून काढला आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया...

जमीन खोदली, सापडला विद्रूप सांगाडा, धाब्यावर घडलं असं काही की पोलीसही हादरले; भयानक घटनेनं खळबळ!
Tourist Hotel
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 10, 2026 | 4:35 PM

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एका धाब्यावर घडलेल्या एका संतापजनक आणि रहस्यमय घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. धाब्यावर आचारी म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा मृतदेह तब्बल सहा महिन्यांनंतर जमिनीतून उकरून बाहेर काढण्यात आला आहे. नागपूर ग्रामीण पोलिस आणि रामटेक पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई करून हा प्रकार उघडकीस आणला आहे.

नेमकं काय घडलं?

मृत व्यक्तीचे नाव प्रताप सिंह महादेव सिंह बैंस उर्फ ठाकूर असे आहे. तो या धाब्यावर आचारी म्हणून काम करत होता. सहा महिन्यांपूर्वी दारूच्या नशेत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. मात्र, या घटनेची पोलिसांना कोणतीही माहिती न देता धाब्यावरील कर्मचाऱ्यांनी मृतदेह धाब्याच्या मागील बाजूस जमिनीत गाडून टाकला होता.

गुप्त माहितीवरून पोलिसांची कारवाई

पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर रामटेक पोलिस आणि नागपूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी खोदकाम करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह पुढील तपासासाठी नागपूर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात पाठवण्यात आला असून, फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे.

चार कर्मचारी ताब्यात

या प्रकरणी धाब्याचे चार कर्मचारी ताब्यात घेण्यात आले आहेत. रामटेक पोलिस पुढील तपास करत असून, मृत्यूची नेमकी कारणे आणि मृतदेह गुपचूप गाडण्यामागील हेतू यांचा शोध घेतला जात आहे. आत्महत्या असली तरी मृतदेहाची योग्य प्रक्रिया न करता गाडणे हे गंभीर गुन्हा असल्याने पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. स्थानिक लोकांनी अशा प्रकारे मृतदेह हाताळणे हे अमानुष आणि कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Follow Us