चपला दिसल्या अन् काळजाचा थरकाप उडाला… खड्डात एकामागोमाग… नागपूरच्या त्या घटनेने सर्वच हादरले?

Nagpur News : रामटेक तालुक्यातील खैरी बिजेवाडा ग्रामपंचायत हद्दीतील पाचगाव येथे अत्यंत धक्कादायक घटना घडलीये. खड्ड्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 

चपला दिसल्या अन् काळजाचा थरकाप उडाला... खड्डात एकामागोमाग... नागपूरच्या त्या घटनेने सर्वच हादरले?
| Edited By: | Updated on: Jul 28, 2025 | 1:25 PM

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील खैरी बिजेवाडा ग्रामपंचायत हद्दीतील पाचगाव येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. खड्ड्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. शाळेतून सुट्टी झाल्यानंतर खेळण्यासाठी गेलेल्या दोन सहा वर्षीय मुलांचा मोकळ्या जागेतील खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडालीये. खैरी बिजेवाडा पाचगाव येथील रहिवासी सात वर्षीय उत्कर्ष लोकेश लांजेवार आणि रिधान संजय सहारे दोघेही दुपारी शाळेतून घरी परतले.

जेवण करून खेळायला गेलेल्या चिमुकल्यांचा मृत्यू

शाळेतून घरी आले आणि सायंकाळी जेवण केल्यानंतर खेळायला घराबाहेर गेले. घराजवळूनच काही अंतरावर असलेल्या एका खड्ड्याजवळ ते पोहोचले. दिवसभर पाऊसाच्या सरीमुळे खड्ड्यात पाणी साचले होते. दोघांना त्या खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि पाणी खेळण्यासाठी पायातील चप्पल बाहेर काढून खड्ड्यात उतरले.

चपलीमुळे पाण्यात बुडालेल्या चिमुकल्यांचे मिळाले मृतदेह

खड्डा खोल असल्याने त्या दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला. खेळायला गेलेली मुले परत आली नसल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. घराच्या काही अंतरावर खड्ड्याजवळ दोन्ही मुलांच्या चपला दिसून आल्या. एकाने खड्ड्यात उतरून पाहिले असता पाण्याखाली एक मुलगा आढळून आला तर आणखी शोध घेतला असता दुसऱ्या मुलाचा मृतदेह दिसून आला. मुलांना बघून कुटुंबियांनी हंबरडा फोडला.

घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव 

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संपूर्ण घटनेची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चाैकशी सुरू केलीये. मात्र, या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. काही वेळात खेळून घरी येतो असे सांगून निघालेले चिमुकले परतलेच नसल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या राज्यात सर्वदूर पाऊस असून पावसाचे पाणी मोठ्या खड्ड्यांमध्ये साचते. पाण्यामुळे खड्डा नेमका किती खोल आहे, याचा अंदाज येत लावणे कठीण होते. पावसाळ्यात खड्डयात पडून मृत्यू झाल्याच्या घटना या अधिक ऐकायला देखील मिळतात.