सचिन तेंडुलकर यांना ऑनलाईन गेमची जाहिरात करणं भोवणार?; बच्चू कडू यांनी केलं मोठं विधान

राज्य सरकारने आता मंत्रिमंडळ विस्तार करून फायदा नाही. थोड्याच दिवसात आचारसंहिता लागणार आहे. पाच सात महिन्यांसाठी मंत्रिमंडळ विस्तार करून फायदा नाही.

सचिन तेंडुलकर यांना ऑनलाईन गेमची जाहिरात करणं भोवणार?; बच्चू कडू यांनी केलं मोठं विधान
bacchu kadu
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 05, 2023 | 9:20 AM

नागपूर | 5 ऑगस्ट 2023 : ऑनलाईन गेमची जाहिरात करणं मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना भोवणार असल्याची चिन्हे आहेत. सचिन तेंडुलकर यांनी ही जाहिरात केल्यामुळे माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. ही जाहिरात केल्याबद्दल सचिन तेंडुलकर यांना नोटीस बजावण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी थेट राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमची जाहिरात केली आहे. या प्रकरणी सचिन तेंडुलकर यांना राज्य सरकारने नोटीस पाठवून जाब विचारला पाहिजे. सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. भारतरत्न असलेल्या व्यक्तीने ऑनलाईन गेमला प्रोत्साहन देणं योग्य नाही. हे चुकीचं आहे. त्यामुळे सचिन यांना नोटीस पाठवून त्यांना जाब विचारला जावा, अशी मागणी करतानाच राज्य सरकारने ऑनलाईन गेमवर बंदी घालावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

हा जुगाराचा अड्डा नाही

बच्चू कडू यांनी यावेळी आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावरही टीका केली. काल मी सभागृहात बोलत होतो. तेव्हा आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव हे चहाच्या टपरीवर बोलत असल्यासारखे बोलत होते. त्यांना बोलायचं होतं तर त्यांनी बाहेर जाऊन बोलायला हवं होतं. म्हणूनच मी हा जुगाराचा अड्डा नाही, असं म्हटलं होतं, असं बच्चू कडू म्हणाले.

कर्जमाफीसाठीचा निधी द्या

राज्यात दोन्ही कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी मिळायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच राज्य प्रदूषण मंडळ स्वायत्त आहे. त्यात चुकीचा कारभार होणं योग्य नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

महापालिकेत काय केलं?

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. आमच्या सरकारला खोके सरकार म्हणण्याचा उद्धव ठाकरे यांना अधिकार नाही. त्यांनी मुंबई महानगरपालिकेत काय केलं? येवढे वर्षे तिथे त्यांची सत्ता होती ना? असा सवालही त्यांनी केला. तसेच सरकारच्या कामाला पसंती देत आहे म्हणून अजितदादा गटाकडे अजून आमदार येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विस्ताराचा फायदा नाही

यावेळी त्यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरही नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने आता मंत्रिमंडळ विस्तार करून फायदा नाही. थोड्याच दिवसात आचारसंहिता लागणार आहे. पाच सात महिन्यांसाठी मंत्रिमंडळ विस्तार करून फायदा नाही, असं सांगतानाच विस्ताराच्या दिवशी मी परदेशात असेल असंही ते म्हणाले.