Chandrapur: चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेचा सस्पेन्स टोकाला, उद्धव सेनेचा महापौर होणार? पडद्यामागे मोठ्या हालचाली

Shivsena firm for Mayor Post : चंद्रपूरमध्ये काँग्रेसला दुफळीचा फटका बसणार का, याची चर्चा रंगली आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने गेम पालटवला आहे. भाजपसह काँग्रेसला उद्धव सेनेचे साथ हवी आहे. उद्धव सेनाच इथं किंगमेकर आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा सस्पेन्स टोकाला पोहचला आहे.

Chandrapur: चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेचा सस्पेन्स टोकाला, उद्धव सेनेचा महापौर होणार? पडद्यामागे मोठ्या हालचाली
चंद्रपूर महापालिकेत उद्धव सेना किंगमेकर
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Feb 10, 2026 | 8:40 AM

Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेचा खेळ राज्याच चर्चेला आला आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला दुफळीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही गटातील वादाचा तिसर्‍यालाच लाभ होण्याची दाट शक्यता आहे. भाजपसह काँग्रेसला उद्धव सेनेचे साथ हवी आहे. तर उद्धव सेनेने महापौर पदासाठी डाव टाकला आहे. ठाकरे सेना ही इथं किंगमेकर ठरली आहे. भाजपने ठाकरेसेनेला सत्ता स्थापनेसाठी सव्वा सव्वा वर्षे महापौर पदाची ऑफर दिल्याने काँग्रेस पुढे मोठे आव्हान उभं ठाकलं आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा सस्पेन्स टोकाला पोहचला आहे.

ठाकरे सेना किंगमेकर

चंद्रपूर महापालिकेत ठाकरेसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे. महापौर पदासाठी ठाकरेसेनेसोबत चर्चा सुरू आहे. पक्ष निरीक्षक सुनील केदार आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासोबत चर्चेची एक फेरी संपली आहे. यामध्ये ठाकरेसेने महापौरपदाची मागणी केल्याचे समजते. महापौर पदासाठी उद्धव सेना आग्रही दिसली. काँग्रेस उद्धव सेनेचे मन वळवण्याचे आणि भाजपसारखी ऑफर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बैठकीनंतर याविषयीचा खुलासा होईल. पण ठाकरे सेना इथं किंगमेकरच्या भूमिकेत आल्याने भाजपपेक्षा काँग्रेससमोर मोठं आव्हान उभं ठाकल्याचं मानलं जात आहे.

चंद्रपूर महापौरपदाचा सस्पेन्स टोकाला

महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी होणाऱ्या निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने आपल्या उमेदवार संगीता खांडेकर यांच्यासाठी अधिकृत व्हीप जारी करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचवेळी काँग्रेसकडून उद्धवसेनेला परभणी फॉर्म्युल्याची आठवण करून देत सोबत घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहे. मात्र उद्धवसेना महापौरपदावर कोणतीही तडजोड न करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने सत्तास्थापनेचा पेच अधिक गडद झाला आहे.

भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या शब्दानुसार भाजपने व्हीप जारी केला असून, याआधी उद्धवसेनेसमोर सव्वा-सव्वा वर्षांसाठी महापौरपद, उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र महापौरपदावरूनच बोलणी फिस्कटली, काँग्रेसच्या उद्धवसेनेसोबत वाटाघाटी सुरूच आहेत. काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी स्वतः मैदानात उतरून प्रयत्न सुरू केले आहेत.

परभणी पॅटर्नची चर्चा

परभणीत काँग्रेस उद्धवसेनेला मदत करेल आणि चंद्रपूरात उद्धवसेनेने काँग्रेसला मदत करावी, या फॉर्म्युल्यावरही उद्धवसेना मानायला तयार नाही. महापौरपदावरच अडून बसल्याने चर्चेला निर्णायक वळण मिळाले नाही. त्यामुळे उद्धव सेना चंद्रपूरमध्ये भाजपसोबत जाणार का, ही चर्चा जोर धरू लागली आहे. बहुमताच्या जवळ असतानाही सत्ता हातातून गेली तर काँग्रेसवर ही मोठी नामुष्की असेल, अशी चर्चा शहरात रंगली आहे