Nagpur Hit and Run Case : कुछ तो गडबड हैं? संकेत बावनकुळे आणि त्याचे मित्र बारच्या सीसीटीव्ही फुटेजमधून गायब
नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणी सीसीटीव्ही संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यात संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार आणि आणखी एक तरुण हे सीसीटीव्ही फुटेजमधून गायब असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात हिट अँड रन प्रकरणाच्या घटनांमध्ये काही केल्या घट होताना दिसत नाही. विशेष म्हणजे हायप्रोफाईल, धनाड्यांच्या मुलांकडून भरधाव वाहनं चालवून इतरांचा जीव धोक्यात टाकला जातोय. मुंबई पासून पुणे अगदी आता महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातही या घटना वाढल्या आहेत. राज्यात अशाच एका घटनेची सध्या जोरदार चर्चा आहे. या घटनेवर प्रचंड राजकारण तापलेलं आहे. ही घटना म्हणजे नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरण. या प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांचं नाव समोर आलं आहे. 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री संकेत बावनकुळेच्या भरधाव कारने अनेक वाहनांना धडक दिली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. या घटनेवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पहिल्यांदा संकेत बावनकुळे यांचं नाव घेतलं आणि प्रकरण तापलं. याच प्रकरणी आता अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. संबंधित माहितीमुळे या प्रकरणात काहीतरी गडबड आहे का? पुराव्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत.
नागपूरातील ऑडी कार अपघात प्रकरणी सीसीटीव्ही संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यात संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार आणि आणखी एक तरुण हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नाही. संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज लाईव्हमध्ये पाहण्याची सोय आहे. त्याचे रेकॉर्डिंग डीव्हीआरमध्ये झालेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या विशेष पथकाने जेव्हा हॉटेलमध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचे प्रयत्न केले, तेव्हा चारही तरुण तिथे गेले असताना ही ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झाल्याचे दिसून आलेले नाहीत.
संकेत आणि त्याच्या मित्रांचे फुटेज डिलीट?
पोलिसांनी पुढील तपासणीसाठी हॉटेलचे डीव्हीआर जप्त केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, पोलीस या डीव्हीआरची फॉरेन्सिक चाचणीही करणार आहेत. त्यामुळे जर काही फुटेज त्याच्यामधून डिलीट केले गेले असतील, तर ते नक्कीच फॉरेन्सिक चाचणीत समोर येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, लाहोरी हॉटेल ते अपघात स्थळादरम्यान तीन ते चार ठिकाणांचे रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामध्ये दिसत असलेल्या चित्रीकरणाच्या आधारावर पोलिसांचा सध्याचा तपास सुरू आहे.
‘कुणाचाही मुलगा असूद्या…’
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर आज प्रतिक्रिया दिली. “पोलीस चौकशीवर दबाव येणार नाही. मी कधीही पोलिसांना फोन केला नाही. फक्त एकदा माहिती घेतली. त्या दिवशी राज्यात देशाचे केंद्रीय गृहमंत्री होते. त्यांना सुद्धा मी बोललो नाही. पोलिसांनी कोणाचाही मुलगा असो, माझा असो किंवा सर्वसाधारण. फक्त आता एकच भाग तो म्हणजे गाडी चालवणारा आणि गाडीत बसणाऱ्यावर कोणता गुन्हा? याचाच तपास पोलीस करतील”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली आहे.