बागेश्वर बाबा यांना नागपूर पोलिसांची क्लिन चीट, म्हणाले आम्ही सगळे व्हिडिओ पाहिले पण…

मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

Updated on: Jan 25, 2023 | 4:07 PM

नागपुरात 7-8 जानेवारी रोजी बागेश्वर बाबा यांचा दिव्य दरबार आयोजित करण्यात आला होता.

बागेश्वर बाबा यांना नागपूर पोलिसांची क्लिन चीट, म्हणाले आम्ही सगळे व्हिडिओ पाहिले पण...
Image Credit source: social media

गजानन उमाटे, नागपूरः बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री Dhirendra Shastri) उर्फ बाहेश्वर बाबा (Bageshwar baba) यांनी नागपुरात येऊन कोणतंही अंधश्रद्धा पसरवणारं विधान केलं नाही, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू असून असे अंधश्रद्धाविषयक अथवा चमत्कारांचे दावे करणाऱ्या व्यक्तीविरोधात तत्काळ कारवाई केली जाऊ शकते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) यांनी बागेश्वर बाबा यांच्या नागपुरातील एका कार्यक्रमातील वक्तव्यांविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सदर कार्यक्रमांतील व्हिडिओ खंगाळून काढले. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्यांना लागू होत नाही, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली.

काय म्हणाले पोलीस आयुक्त?

श्याम मानव यांच्या तक्रारीला उत्तर देताना नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘ नागपुरातले 8 जानेवारीचे सगळे व्हिडिओ बारकाईने पाहण्यात आले. या व्हिडिओंद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा पसरवली जातेय असं दिसून येत नाही. किंवा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन झालंय, असं दिसून आलं नाही, या निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलो आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

श्याम मानव यांची प्रतिक्रिया काय?

तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नागपूरमध्ये बागेश्वर बाबा यांचा दिव्य दरबार भरला. त्यात त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांना अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होतो, असा दावा श्याम मानव यांनी केला आहे.

महाराष्ट्रात हा कायदा लागू असल्याने बागेश्वर बाबांचे दावे प्रसारीत करणाऱ्यांनाही हा कायदा लागू होतो. त्यासाठी समान शिक्षेची तरतूद आहे, असा इशाराही श्याम मानव यांनी दिला आहे.

दिव्य दरबाराच्या निमित्ताने महाराजांचे जुने व्हिडिओ लोकांनी पाहिले, ते दाखवण्यात आले या ठिकाणीही हा कायदा लागू होतो.

नागपुरात 7-8 जानेवारी रोजी बागेश्वर बाबा यांचा दिव्य दरबार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बागेश्वर बाबांचे व्हिडिओ दाखवण्यात आले तसेच ते चमत्कार करू शकतात, असे दावे करण्यात आल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई नाही केली तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जाण्याची तयारी असल्याचं श्याम मानव यांनी सांगितलंय.

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI