एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? भाजपच्या बड्या नेत्याने थेट सुनावले; म्हणाला, पुढची निवडणूक

शिंदे गटाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे पुढील मुख्यमंत्री होतील असा निर्धार व्यक्त केला आहे. यावर भाजप आमदार परिणय फुके यांनी शिंदे सेनेला सुनावले की, पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ठरवतील. फुके यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्रीपदावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? भाजपच्या बड्या नेत्याने थेट सुनावले; म्हणाला, पुढची निवडणूक
eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2026 | 11:58 AM

गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले पाहिजे. पुढच्यावेळी एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार असल्याचा निर्धार शिंदे सेनेच्या नेत्यांनी केला आहे. आमदार किशोर दराडे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे विधान केलं आहे. कालच्या दसऱ्या मेळाव्यातही एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नेत्यांनी शिंदेंना मुख्यमंत्री करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आता भाजपचे नेते आमदार परिणय फुके यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे सेनेच्या नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे. पुढचा मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच ठरवतील, अशा शब्दात फुके यांनी शिंदे सेना नेत्यांना सुनावलं आहे.

आमदार परिणय फुके यांनी मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्रीपदावर भाष्य केलं आहे. आपलाच नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, हे प्रत्येकाला वाटतं. त्यात काही गैरही नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास पुरुष आहेत. सर्व क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय काम आहे. त्यामुळे पुढची निवडणूक फडणवीस यांच्या नेतृत्वात लढवली जाणार आहे. 250 पार आम्ही जाऊ. मुख्यमंत्री कोण होणार हे तेव्हा फोडणवीस ठरवतील, असं परिणय फुके यांनी म्हटलं आहे.

Loading...

यापेक्षा वाईट अवस्था नाही

रिजिम चेंजच्या मुद्द्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी दिवा स्वप्न बघणं सुरू केलं आहे. ठाकरे म्हणतात दीपकेच्या नेतृत्वात काम करतो. यापेक्षा त्यांची वाईट अवस्था नाहीये. बांगलादेश, नेपाळसारखं आपल्या देशात कधीही होणार नाही. कारण भारतात बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आहे, असंही फुके यांनी ठणकावलं.

वाझेचं काय झालं ते सांगा?

बिश्नोई गँगच्या हल्ल्यावरुनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. सचिन वाझे यांचं काय झालं ते उद्धव ठाकरे यांनी सांगावं. त्यांचं सरकार असताना पोलीस अधिकारी वाझे याने एका व्यावसायिकाच्या घराबाहेर बॅाम्ब ठेवला होता. दिशा सालीयान प्रकरणात त्यांचा मुलगा जेलमध्ये जाण्याची भिती आहे म्हणून ते फ्रस्टेट आहे, असं सांगतानाच ते कुठेच सत्ता आणू शकत नाही, असा दावा त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us