Post Office Controversy : खुंबे काय मारले, एकमेकींना रेटारेटी, दोन महिला अधिकाऱ्यांनी पोस्टाची अब्रु वेशीवर टांगली,Video झाला Viral
Two Female Officers Fight over seat : नागपूरमध्ये दोन महिला अधिकाऱ्यांची भर कार्यक्रमात अधिकार, पद आणि एका सोफ्यावरून चांगलीच जुंपली. या दोघींनी एकमेकींना खुंबे काय मारले. रेटारेटी काय केली. नागपूरकरांना जणू काही नळावरचे भांडण याचि देहि, याचि डोळा पाहता आले.

Union Minister Nitin Gadkari : नागपूरच्या सरकारी कार्यक्रमात दोन महिला अधिकाऱ्यांमधील धुसफूस सर्वांनी ‘याचि देहि, याचि डोळा’ पाहिली. नळावरील भांडणाची आठवण भर कार्यक्रमात यामुळे उपस्थितांना आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे हजर असताना हा प्रकार कॅमेऱ्यात टिपल्या गेला. या महिला अधिकाऱ्यांनी एकमेकींच्या झिंज्या तेवढ्या उपटल्या नाहीत, तितकेच काय नागपूरकरांवर त्यांचे उपकार म्हणावे लागतील. असे अधिकाऱ्यांचे ‘टपाल’ आता पोस्ट खाते कुठे पाठवते याची चर्चा सुरू झाली आहे.
कोपराने धक्के, एकमेकींना रेटले
नागपूरात सरकारी कार्यक्रमात महिला अधिकाऱ्यांची धुसफूस लाईव्ह झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोरच पोस्ट खात्यातील दोन उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्यांची धुसफूस चव्हाट्यावर आली. पोस्ट खात्यातील एका उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्याला कोपराने धक्के दिले. पोस्टमास्टर जनरल पदावरुन दोन अधिकाऱ्यांमधला वाद सर्वांसमोर आला.
काय आहे वाद?
पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांची ८ सप्टेंबर रोजी कर्नाटक राज्यातील घारवाडला बदली झाली. नवीन नियुक्तीपर्यंत नागपूरचा प्रभार नवी मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल सुचिता जोशी यांना देण्यात आला. पण बदलीच्या आदेशाला मधाळे यांनी न्यायालयात आव्हान दिले आणि बदलीवर स्थगिती मिळवली. त्यामुळे मधाळे आणि जोशी यांच्यात वाद सुरु आहे. तो वाद काल रोजगार मेळाव्यात दिसला.
कर्मचाऱ्यांच्या माना खाली गेल्या
कालच्या रोजगार मेळाव्यात पोस्ट मास्टर जनरल निमंत्रित होत्या, त्यामुळे सुचीता जोशी मंचावर होत्या. शोभा मधाळे या सुद्धा कार्यक्रमात आल्या. एकाच सोफ्यावर दोघीही बसल्या. त्यानंतर दोघींमधील धुसफूस सुरु झाली. मधाळे यांनी जोशी यांच्या हाताला धक्का दिला, साडीवर पाणी सांडले, डाव्या हाताला चिमटाही काढला. हा सारा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी उपस्थित टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांनाही आता काय करावे. कुणाला समजावावे असे झाले. काहींनी हा सर्व प्रकार पाहून माना खाली घातल्या. तर काहींचे चांगले मनोरंजन झाले.
दोघींच्या या वर्तवणुकीवरून पोस्टाची प्रतिमा मलीन झाल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी होत आहे. भर कार्यक्रमात इतके बेशिस्त वर्तन तेही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी करावे याविषयी त्यांना जाब विचारण्यात यावा अशी मागणी होत आहे. त्यांना सोफ्यापुढे स्वतःच्या पदाचेही भान राहिले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. काहींनी तर त्यांना तो सोफा वाटून द्यावा अशी मागणी करून या दोन्ही अधिकाऱ्यांना चांगलाच चिमटा काढला आहे.
व्हायरल व्हिडिओ
