‘माझ्या विरोधात षडयंत्र, मी…’, जातीचा उल्लेख करत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या रश्मी बर्वे काय म्हणाल्या?

| Updated on: Mar 21, 2024 | 3:14 PM

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी रश्मी बर्वे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना या मतदारसंघासाठी उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार हे देखील रश्मी बर्वे यांच्या नावासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. असं असताना आता रश्मी बर्वे यांच्यावर अवैध जातप्रमाणपत्राचा आरोप केला जातोय. हे आरोप खरे ठरले तर रश्मी बर्वे यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते. याच आरोपांवर आज अखेर रश्मी बर्वे यांनी भूमिका मांडलीय.

माझ्या विरोधात षडयंत्र, मी..., जातीचा उल्लेख करत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या रश्मी बर्वे काय म्हणाल्या?
काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे
Follow us on

नागपूर | 21 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापायला लागलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. प्रत्येक मतदारसंघात अनेक जण विविध पक्षांमधून इच्छुक आहेत. रामटेक मतदारसंघातही काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांचं नाव चर्चेत आहे. पण असं असताना रश्मी बर्वे यांच्याकडे अवैध जातप्रमाणपत्र असल्याचा आरोप केला जातोय.विशेष म्हणजे रश्मी बर्वे यांना याबाबत नोटीसही देण्यात आल्याची चर्चा आहे. अखेर या आरोपांवर रश्मी बर्वे यांनी भूमिका मांडली आहे.

“मी गरीब कुटुंबातील मागासवर्गीय महिला आहे. लहानपणी माझे वडील गेले. मला जिल्हा परिषद सदस्य बनण्याची संधी मिळाली. मी काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या मार्गदर्शनात विकासकामे केली. माझं जातप्रमाणपत्र अवैध असल्याचं विरोधकांकडून सांगण्यात आलं. यामागे विरोधीपक्ष आहे. मला नोटीस आली, अशा बातम्या मला टीव्ही चॅनलवरून दिसल्या. पण मला हातात नोटीस मिळाली नाही”, असं रश्मी बर्वे म्हणाल्या.

‘माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जातंय’

“माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे. मी मागासवर्गीय चांभार समाजाची आहे. माझं जात प्रमाणपत्र अवैध आहे तर मग मी एवढे दिवस जिल्हा परिषद सदस्य म्हणून कसे काम करत आहे? मला नोटीस मिळाली नाही. ऐन निवडणुकीच्या आधी माझं नाव उमेदवारीसाठी घेतलं जातं असताना हा सगळा प्रकार का होत आहे? हे षडयंत्र आहे. कारण माझं नाव सध्या उमेदवारीसाठी आघाडीवर आहे”, असा दावा रश्मी बर्वे यांनी केला.

‘मी सुनील केदार यांची कट्टर समर्थक म्हणून…’

“मी सुनील केदार यांची कट्टर समर्थक आहे म्हणून मला बदनाम केलं जात आहे. कोणी तक्रार केली याची सुद्धा मला माहिती नाही. मला विरोधक बदनाम करत आहेत की कोण हे मला माहीत नाही. मात्र मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. रश्मी बर्वेच्या माध्यमातून सुनील केदार यांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न आहे”, असा देखील दावा रश्मी बर्वे यांनी केला.