महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार का? शरद पवारांच्या भेटीनंतर पटोलेंचं मोठं वक्तव्य

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत, यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार का? शरद पवारांच्या भेटीनंतर पटोलेंचं मोठं वक्तव्य
| Updated on: Jan 22, 2025 | 9:38 PM

पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. माहायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मात्र काही पक्षांकडून या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी सुरू असल्याची देखील चर्चा आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, या भेटीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले नाना पटोले? 

मी एका लग्नासाठी पुण्याला आलो होतो, त्यामुळे मी पवार साहेबांची भेट घेण्यासाठी इथे आलो. सध्या कोर्टाची तारीख पे तारीख चालली आहे. काल तारीख होती. ओबीसींच्या आरक्षणाबाबतची तारीख होती. विरोधी पक्षात होते तेव्हा फडणवीस म्हणायचे की, 24 तासांत आरक्षण आणेल, पण आता तीन वर्ष झालेत ते सत्तेत आहेत. पण अजूनही ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाहीये, आता पुन्हा तारीख पुढे गेली आहे. निवडणुका लागतील की नाही लागतील हा प्रश्न आमच्या सगळ्यांपुढे आहे. त्यामुळे आता त्याच्यावरची चर्चा हा काही भाग होऊ शकत नाही. ज्यावेळी निवडणुका लागलीत तेव्हा स्थानिक कार्यकर्त्यांना विचारून या सगळ्या निवडणुकीचं प्लॅनिंग महाविकास आघाडी म्हणून आम्ही करू असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीमध्ये सर्व अलबेल

दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील भेट घेतली, आज नाना पटोले हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले, यावरून महाविकास आघाडीमध्ये सर्व अलबेल आहे का? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जेव्हा आम्ही भेटतो म्हणजे सर्व अलबेलच आहे. जर भेटत नसतो तर अलबेल नसतं.
आपण महायुतीमध्ये सध्या पाहातो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आजूबाजुला बसतात, पण ते  एकमेकांच्या तोंडाकडेही बघत नाहीत. त्यामुळे तिथे अलबेल किती आहे हे तुम्हाला कळतंय, असं यावेळी पटोले यांनी म्हटलं आहे.