मित्रांनो मला माफ करा… पुणे गाव नदी… ब्रीज… व्हॉटसअॅपवर स्टेटस अन्… शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं
'मित्रांनो मला माफ करा... मी मझ्या मुलांना संपवून स्वतःला संपवत आहे...', शिक्षकाने स्वतःच्या दोन मुलांसोबत गोदावरी नदीत कार घालून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. व्हॉटसअॅपवर स्टेटस ठेवत शिक्षकाने वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. घडलेल्या प्रकरणानंतर सर्वत्र खळबळ माजाली आहे.

समोर दिसणारी व्यक्ती उत्तम दिसत असली तरी, त्या व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे, हे ओळखणं फार कठीण असतं. असंच काही एका शिक्षकासोबत झालं आहे. अखेर वरिष्ठांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिक्षकाने स्वतःला तर संपवलंच, पण स्वतःच्या दोन निष्पाप मुलांचं आयुष्य देखील सोबतच संपवलं आहे. शिक्षकाने व्हॉटसअॅपवर स्टेटस ठेवत स्वतःचा आणि दोन मुलांचा अंत केला आहे. ‘मित्रांनो मला माफ करा… मी मझ्या मुलांना संपवून स्वतःला संपवत आहे…’, असं स्टेटस शिक्षकाने व्हॉटसअॅपवर ठेवल्याचं समोर येत आहे. शिक्षकाने गोदावरी नदीत स्वतःची कार टाकून आत्महत्या केली आहे. पोलीस आता याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
वरिष्ठांना जबाबदार ठरवून मुलांसह स्वतःच्या आयुष्याचा अंत करणाऱ्या शिक्षकाचं नाव सुनील मोरे असं आहे. सुनील मोरे हे मूळचे भोकर तालुक्यातील बेंबर गावचे राहणारे होते. तर पोटा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत मोरे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यावर वरिष्ठांचा दबाव होता. अशात सुनील मोरे यांनी मुदखेड तालुक्यातील पुणेगाव परिसरातील आमदुरा घाटावरून कार गोदावरी नदीच्या पात्रात वेगाने टाकून टोकाचं पाऊल उचललं.
यामध्ये सुनील मोरे यांचं निधन झालं असून, मुलगी सारा आणि मुलगा सुमित याचा देखील मृत्यू झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, स्वतःचं आयुष्य संपवण्यापूर्वी सुनील मोरे यांनी व्हाट्सअॅपवर स्टेटस ठेवलेलं. त्या स्टेटसमध्ये त्यांनी हदगावचे गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्याकडून सतत होत असलेल्या मानसिक जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत आहे… असं लिहिलं.
दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिघांना शोधण्यासाठी शोधकार्य सुरु केलं. अखेर ‘एसडीआरएफ’ (SDRF) च्या पथकाने अनेक प्रयत्नांनंतर नदीच्या पात्रातून कार बाहेर काढली. कार बाहेर काढल्यानंतर शिक्षक आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढले.
अखेर या घटनेनंतर संबंधित व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात येईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय घडलेल्या घटनेमुळे शिक्षण वर्गात मोठी खळबळ उडाली असून सुनील मोरे यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.