
Shaktipeeth Mahamarg : नागपूर-गोवा शक्तिपीट महामार्ग प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने हा प्रकल्प राबवण्यास तब्बल 20 हजार 787 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता हा महामार्ग ज्या-ज्या जिल्ह्यांतून जात आहे, त्या भागातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले आहे.
नांदेडच्या मालेगाव येथे शेतकऱ्यांनी एकत्रित केले बोंबाबोंब आंदोलन आले. यावेळी शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगाने काढलेल्या शासन निर्णयाची केली होळी करण्यात आली. सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट, आमच्या लेकरा बाळांना ड्रीम नाहीत का? यावेळी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. जमिनीची मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांना मारू नाही तर मरू असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतली.
महामार्गाचे विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. आज (25 जून) नांदेड, परभणी व हिंगोली येथील शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली. बैठकीनंतर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगाने काढलेल्या शासनाने निर्णयाची शेतकऱ्यांनी होळी केली. आमची वडिलोपार्जित जमीन जात असेल तर आम्हाला हा शक्तिपीठ मार्ग काय कामाचा? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
शक्तिपीठ महामार्गाला आम्ही एक इंचही जमीन देणार नाही, असा निर्धारसुद्धा यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून या शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे.
गेली 14 महिने आम्ही आंदोलन केलं. निवेदन दिले. मुंबईला जाऊन धरणे धरले. तरीदेखील शासनाने आमची कुठलीही दखल घेतली नाही. राज्यपालाच्या अभिभाषणात शासनाने सांगितलं शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही काही करणार नाही. तरीदेखील काल शासन आदेश काढण्यात आला. सरकारला शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायचं नाही. मुख्यमंत्र्यांना एकच सांगायचे तुम्ही एकतर्फी निर्णय घेता, आता आमचे दुसरे महायुद्ध सुरू झाले आहे, असा इशारा सतीश कुलकर्णी नावाच्या एका शेतकऱ्याने दिला आहे.
कोणताही आमदार, खासदार आमच्यासोबत नाही. आम्ही किती बोंबललो तरी सरकार आमची बाजू घ्यायला तयार नाही. आमचा जीव घेतल्याशिवाय सरकारला रस्ता करता येणार नाही, अशी ठाम भूमिका गजानन तिमेवार या शेतकऱ्याने बोलून दाखवली. माझी 13 एकर शेती आहे. शक्तिपीठ महामार्गात नऊ एकर शेती जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात मी हिंदूंचा गब्बर आहे. सगळ्या हिंदूच्या जमिनी जात आहेत. आमची जमीन जात असेल तर आम्ही आमच्या गोमाता कुठे न्यायच्या? असा सवाल प्रमोद इंगोले या शेतकऱ्याने केला.