एका क्षणात तिघांचा मृत्यू! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्… नरवाडे कुटुंबासोबत नको ते घडलं
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडमध्ये नरवाडे कुटुंबातील तिघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे तो दुचाकीला येऊन धडकला. या धडकेत तिघांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. हदगाव तालुक्यातील हडसनी पाटीवर रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाले आहेत. एका भरधाव स्वीफ्ट कारने दोन वेगवेगळ्या दुचाकींना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
एकाच कुटुंबावर काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृतांमध्ये आई, मुलगा आणि आत्याचा समावेश आहे. या घटनेनंतर नांदेड शहर हादरलं आहे. मृतांमध्ये यशवंत नरवाडे (मुलगा) रा. निवघा बाजार, रेखाबाई नरवाडे (आई) आणि अनुसयाबाई लोणारे (आत्या) या तिघांचा समावेश आहे. हे तिघेही निवघा बाजार येथील रहिवासी असून, एकाच दुचाकीवरून जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. तर दुसऱ्या दुचाकीवर असलेल्या दोघांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अपघाताचे स्वरूप
हा अपघात हदगाव तालुक्यातील हडसनी पाटी परिसरात रात्री उशिरा घडला. एक भरधाव स्वीफ्ट कार अनियंत्रित झाली आणि तिने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना एकामागून एक जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, पहिल्या दुचाकीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवर असलेले दोन प्रवासी देखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. यामधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
परिसरात हळहळ
या घटनेनंतर निवघा बाजार परिसरासह संपूर्ण हदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. भरधाव वेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
