
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतर्फे आवाज उठवत या निर्णयाचा जोरदार विरोध करण्यात आला. त्यासंदर्भात 5 जुलैला मोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते. अखेर सरकारने यासंदर्भातील 2 जीआर रद्द केल्याची घोषणा केली आणि मराठी माणूस, मराठी अस्मितेचा विजय झाल्याची प्रतिक्रिया ठाकरे बंधूंनी दिली. गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव हे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, एकत्र येण्याच्या अनेक चर्चा सुरू आहेत, मराठीच्या मुद्यावरून तर दोघेही विजयी मेळाव्यातही एकत्र दिसणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याने महायुतीच्या नेत्यांनी धसका घेतल्याचं चित्र आहे. या विजयी मेळाव्यापूर्वीच ठाकरे बंधूंवर महायुतीचे नेते टीका करताना दिसत आहेत. काही नेते तर उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करून त्यांना टोमणे मारतानाही दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर, एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले पण नंतर बाहेर पडून, अनेक पक्षांतरं करून आता भाजपावासी झालेले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर प्रतिक्रिया देत टीकास्त्र सोडलं आहे. ” याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत” असे म्हणत नारायण राणेंनी कडाडून टीका केली आहे.
परत या म्हणून का प्रयत्न करत आहेत ?
नारायण राणे यांनी X या सोशल मीडिया साईटवरील अकाऊंटवरून त्यांची भूमिका मांडली आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर यथेच्छ टीका करतानाच त्यांना खोचक शब्दात सुनावलंही आहे. ” उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत. ” असा सवाल राणेंनी विचारला आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 1, 2025
जो बूंद से गई वो हौद से नहीं आती !
तसेच, सन्माननीय राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसवले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे मध्ये नाही ! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती ! असेही राणेंनी सुनावलंय.
त्यांच्या या टीकास्त्राला आता उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.