
सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले मस्के?
राज साहेब ठाकरे यांच्यावर किंवा त्यांच्या विरोधात बोलण्याचा विषय काय येतो? ना कुठला पक्ष, ना कुठला झेंडा अशी त्यांची भूमिका होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती, मराठी भाषा सोडून खालच्या पातळीची टीका केली. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी भाषण केलं. उद्धव ठाकरे हे हारलेले दिसून आले. राज ठाकरे आमच्याबद्दल काही बोलले नाहीत म्हणून, आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. मात्र उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्ही बोलत राहू, असं मस्के यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी अतिशय गलिच्छ पद्धतीने भाषण करुन उसन आवसान आणलं. उध्दव ठाकरे यांनी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाषण केलं. महाराष्ट्र, मराठी माणसांवर अन्याय असं भासवून त्यांचा निवडणूक लढण्याचा प्रयत्न आहे. मराठी माणसांना भडकावून त्यांची मत मिळवणे हाच त्यांचा उद्देश होता, असं मस्के यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं वाटोळं केल आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत नेऊन काय वाटोळं झालं हे सर्वांनाच माहिती आहे, असं मस्के यांनी यावेळी म्हटलं, दरम्यान आता त्यांना काँग्रेस सोबत राहायचं आहे का? आणि काँग्रेसला यांच्यासोबत राहायचं आहे का? असा सवालही यावेळी नरेश मस्के यांनी केला आहे.