संजय राऊतांच्या अधिपत्याखाली असलेल्या नाशिकच्या मविआत फुटीचा बिगुल, राजकीय धमका कुठे फुटला?

| Updated on: Apr 29, 2023 | 10:31 AM

नाशिकच्या येवल्यात महाविकास आघाडीत फुटीचा बिगुल वाजला, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारानं छगन भुजबळ यांचे आव्हान स्वीकारले असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

संजय राऊतांच्या अधिपत्याखाली असलेल्या नाशिकच्या मविआत फुटीचा बिगुल, राजकीय धमका कुठे फुटला?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : एकीकडे महाविकास आघाडी आगामी विधानसभेच्या निवडणुका एकत्रित लढल्या जाव्यात यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे मध्ये महाविकास आघाडीत बिघाडीचे बिगुल नाशिकमध्येच वाजले आहे. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आणि नाशिकचे आधिपत्य असलेल्या संजय राऊत यांच्याच पक्षातील आमदाराने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे. छगन भुजबळ आणि नरेंद्र दराडे यांच्यात बाजार समितीच्या निवडणुकीवरुन जुंपली होती. त्याच दरम्यान भुजबळ यांनी दराडे बंधूंनी माझ्याविरोधात निवडणुकीला उभे राहून दाखवावे असे आव्हान केले होते. तेच आव्हान आमदार नरेंद्र दराडे यांनी स्वीकारले आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वजनदार नेते म्हणून छगन भुजबळ यांची ओळख आहे. सलग चार वेळा ते येवला मतदार संघातून निवडून आले आहे. राज्यातील उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांसह अनेक महत्वाची मंत्रीपदाचा कारभार भुजबळ यांनी केला आहे. येवला मतदार संघात आमूलाग्र बदल करण्याचं श्रेय भुजबळ यांना दिलं जातं.

तर दुसरीकडे आमदार नरेंद्र दराडे यांनी अटीतटीच्या लढतीत विधानपरिषदेत बाजी मारली होती. त्यानंतर आमदार नरेंद्र दराडे यांनी त्यांचे बंधु किशोर दराडे यांना देखील आमदार म्हणून निवडून आणले होते. शैक्षणिक संस्था आणि मोठे प्रस्थ असलेले दराडे हे शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, सध्या बाजार समितीची रणधुमाळी सुरू असतांना दराडे बंधूनवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विकास निधी मिळत नसतांना आमदार दराडे यांना निधी कसा मिळतो. ते शिवसेनेतच आहे का? असा प्रश्न उपस्थित करून डिवचलं होतं.

भुजबळ एवढ्यावरच थांबले नाहीत भुजबळ यांनी दराडे यांनी जिल्हा बँक बुडवली म्हणत हल्लाबोल करत आमदारकीच्या निवडणुकीला माझ्या समोर उभे राहून दाखवावे असे आवाहन केले होते. हेच आव्हान आमदार दराडे यांना जिव्हारी लागले. त्यांनी त्यावर भाष्य करत भुजबळ यांच्यावरच गंभीर आरोप केले.

छगन भुजबळ यांच्यावर आमदार दराडे यांनी आरोप करत जिल्हा बँक तुमच्या सारख्या मोठ्या लोकांना कर्ज दिली म्हणून बुडाली आहे. तुम्हीच कोट्यवधी रुपये बुडविले आहे. याशिवाय भुजबळ तुम्ही माझ्या शेपटावर पाय देऊ नका म्हणत तुम्ही उपरे आहात आम्ही भूमिपुत्र आहोत म्हणत दराडे यानं भुजबळ यांचे आव्हान स्वीकारले आहे.

त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीत एकजूट कशी राहील यासाठी प्रयत्न केले जात असतांना आणि विशेषतः संजय राऊत यासाठी प्रयत्न करत महाविकास आघाडीतील आमदारच बिघाडीची भाषा करू लागले आहेत. त्यामुळे राजकीय आखाडा काही महीने वर्षे दूर असला तरी आत्ताच बिघाडीचा बिगुल वाजतांना दिसून येत आहे.