Sanjay Raut : एक शिक्षिका, बलात्काराचा गुन्हा, CCTV, राऊतांनी उपस्थित केलेलं कृष्णा डोंगरे प्रकरण काय?

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी आजच्या नियमित पत्रकार परिषदेत नाशिकमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचा दाखला देत कृष्णा डोंगरे प्रकरणाकडे लक्ष वेधलं. काय आहे हे कृष्णा डोंगरे प्रकरण?.

Sanjay Raut : एक शिक्षिका, बलात्काराचा गुन्हा, CCTV, राऊतांनी उपस्थित केलेलं कृष्णा डोंगरे प्रकरण काय?
Sanjay Raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 15, 2025 | 10:48 AM

एका शेतकऱ्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याचे हाल केले, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी आज सरकारवर केला. सरकारविरोधातील आवाज दाबण्यासाठी हे सर्व करण्यात आल्याच संजय राऊत यांचं म्हणणं आहे. “नाशिकला मागच्या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्याने आंदोलन केलं होतं. कांद्याला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा आंदोलनकर्त्याचा प्रयत्न होता. कृष्णा डोंगरे त्याचं नाव” असं संजय राऊत म्हणाले. “त्याचा राग ठेऊन हा माणूस सतत सरकारविरुद्ध शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो म्हणून नाशिकचे पोलीस अधिकारी नेहमीच खोटी काम करणारे मंत्री यांनी एकत्र येऊन कृष्णा डोंगरे याच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. त्याला रोखण्यासाठी हे सर्व करण्यात आलं” असा दावा संजय राऊत यांनी केला.

“एका भाजप पुरस्कृत शिक्षण संस्था, त्यात शिक्षिका यांना हाताशी धरुन कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लावला. त्याच्यावर अटकेची टांगती तलवार ठेवली. त्याला गावतून पळवून लावलं. सरकार विरुद्ध आंदोलन करायच नाही. मंत्र्याविरुद्ध आंदोलन करायचं नाही म्हणून हे सर्व करण्यात आलं” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसलं?

“ज्या दिवशी बलात्कार झाला, अशा प्रकारचा गुन्हा नोंद झाला, कोर्टात सिद्ध झालं म्हणून सांगतोय, त्या दिवशी कृष्णा डोंगर त्या भागात नव्हते ते सप्तशुंगी गडावर देवदर्शनाला कुटुंबासोबत गेले होते. कुटुंबासह धार्मिक कार्यामध्ये ते असल्याच वणीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप केला” असं संजय राऊत म्हणाले. “जनसुरक्षा कायदा, अर्बन नलक्षवाद अमुक-तमुक वलग्ना करताय अशा पोलीस अधिकाऱ्यांना, अशा मंत्र्याना, भाजपच्या अशा कार्यकर्त्यांना तुम्ही कुठला कायदा लावणार आहात” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

पोलिसांवर काय आरोप केला?

“नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्यासाठी अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल केले. भाजपची सुपारी घेऊन काम करणाऱ्या या पोलिसांमुळे सुनील बागुल, मामा राजवाडे यांना परागंदा व्हायला लागलं. आज ते नाशिकमध्ये आहेत. भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर आहेत म्हणून हात लागला नाही” असा दावा संजय राऊत यांनी केला.