नाशिकमध्ये मोठी खळबळ, मतदानाआधीच दराडे थेट गितेंच्या घरात; बैठक संपताच म्हणाले जाहीर माफी…
नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांनी गणेश गिते यांच्या घरी जाऊन बंद दाराआड चर्चा केली. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांच्या पाठिंब्यासाठी हे प्रयत्न सुरू असून दराडेंनी वादग्रस्त ऑडिओ क्लिपवरही स्पष्टीकरण दिले आहे.

नाशिकमध्ये विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतला आहे. त्यातच आता महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी थेट भाजपचे माजी उपमहापौर गणेश गिते यांच्या निवासस्थानी धाव घेतली. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दराडे यांच्याकडून सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर किशोर दराडे हे गणेश गिते यांच्या घरी गेल्याचे बोललं जात आहे. या दोघांमध्ये साधारण तासाभरापासून अधिक काळ बंद दाराआड खलबतं सुरू होती. यानंतर किशोर दराडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
दिपालीताई युतीधर्म पाळणार, गोकुळ गीतेंनाही भेटणार
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार किशोर दराडे यांनी गीते यांच्या घरी जाण्याबद्दलचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, “दिपालीताई या आमच्या मतदार आहेत. मी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी त्यांच्याकडे मत मागण्यासाठी आलो होतो. त्यांनी मला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, त्या युतीचा धर्म पाळणार असून महायुतीसोबतच राहतील. गणेश भाऊ देखील निवडणुकीच्या स्पर्धेत होते आणि उमेदवारी मागत होते. ही जागा भाजपला जाणार की शिवसेनेला, हे आधी स्पष्ट नव्हते. आता नियमाने ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली असल्याने आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे.
गोकुळ गिते हे माझे छोटे भाऊ आहेत. मी त्यांचीही भेट घेणार असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मदत करावी, अशी विनंती त्यांना करणार आहे. शेवटी पाठिंबा देण्याचा निर्णय ते स्वतः घेतील, असेही किशोर दराडे यांनी म्हटले.
वादग्रस्त व्हिडिओ आणि कुणाल दराडेंच्या ऑडिओ क्लिपवर दिली प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांत व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपवर किशोर दराडे यांनी जाहीरपणे बाजू मांडली. या व्हिडीओबाबत बोलताना ते म्हणाले, मराठी भाषा ही जशी वाकवू तशी वाकते. मी ते सहज बोललो होतो, आमचे ट्युनिंग तसे आहे. पण कोणीतरी अनवधानाने ते व्हायरल केले. यात गोकुळ गिते यांचा काहीही संबंध नाही. राजकारणात कोणीतरी विरोधक असतात, जे आपसात लावून देण्याचे काम करतात. माझा पुतण्या सुशिक्षित (ग्रॅज्युएट) आहे, तो असे बोललेला नाही. त्याने माध्यमांना आधीच स्पष्ट केले आहे की, ती क्लिप फॉरेन्सिक लॅबला पाठवा. जर तो माझा किंवा आमच्या घरातील कोणाचा आवाज असेल आणि आमच्याकडून काही चूक झाली असेल, तर मी जाहीर माफी मागायला तयार आहे,” असे दराडे यांनी म्हटले.
मंत्र्यांच्या बैठकांवर भाष्य
यावेळी त्यांना जिल्ह्यातील मंत्र्यांच्या बैठकांवर आणि वाढत्या सक्रियतेबद्दलही विचारण्यात आले. उमेदवार हा संपूर्ण महायुतीचा आहे. त्यामुळे मंत्र्यांवर पक्षाची आणि युतीची मोठी जबाबदारी असते. नाशिक जिल्ह्यातच नाही, तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मंत्री फिरत आहेत आणि काम करत आहेत. यात कोणतेही आव्हान नसून, युतीचे काम करणे ही मंत्र्यांची जबाबदारीच आहे, असे किशोर दराडे म्हणाले.
