ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर आज भाजपात, पक्षप्रवेशापूर्वी म्हणाले…

नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवकही भाजपमध्ये सामील झाले आहेत. यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर आज भाजपात, पक्षप्रवेशापूर्वी म्हणाले...
sudhakar badgujar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 17, 2025 | 8:09 AM

नाशिकच्या राजकारणात आज मोठा फेरबदल घडणार आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत बबन घोलप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांमधील डझनभर माजी पदाधिकारी आणि नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बदल होणार आहेत. तसेच बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश निश्चित

सुधाकर बडगुजर यांचा आज भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षप्रवेशापूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे औक्षण केले. “आता सुरुवात आहे. सर्व सहकारी येतात. सर्व सहकारी आल्यानंतर थोड्याच वेळात आम्ही रवाना होऊ, भरपूर लोक आहेत. लवकरच चित्र स्पष्ट होईल,” अशी प्रतिक्रिया सुधाकर बडगुजर यांनी दिली. आज दुपारी १ वाजता मुंबईतील भाजपच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. गिरीश महाजन आणि भाजपचे सर्व वरिष्ठ नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत.

गणेश गीते यांचीही घरवापसी

सुधाकर बडगुजर यांच्यासोबतच माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. त्यासोबतच देवानंद बिरारी, अशोक सातभाई, कन्नू ताजणे, बबन घोलप, नयना घोलप, वंदना बिरारी, हर्षा बडगुजर यांचाही प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. भाजपच्या स्थानिक आमदारांसह काही पदाधिकाऱ्यांकडून या प्रवेशाला सुरुवातीला विरोध होता. परंतु पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांची समजूत काढल्यानंतर प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला होता.

महायुतीत इनकमिंग सुरू

सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी या दिशेने तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीत सध्या इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधून महायुतीमध्ये येणाऱ्यांचा ओढा वाढला आहे. आगामी मनपा निवडणूक जिंकण्यासाठी हे प्रवेश महत्त्वाचे मानले जात आहेत. परंतु यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींमधील अस्वस्थता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच दोन गटांतील संघर्षामुळे भाजपची भविष्यात डोकेदुखी वाढण्याची चिन्हे पाहायला मिळत आहे.

शिंदे गटात अस्वस्थता

भाजपमध्ये होत असलेल्या या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटात मात्र अस्वस्थता पसरली आहे. कोणाला पक्षात प्रवेश दिला जातो याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. या प्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात येत्या काळात अनेक मोठे बदल होणार असल्याचे बोललं जात आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसला बसलेला हा धक्का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.