चर्चा तर होणारचः नाशिकमध्ये 40 प्रभाग तीन सदस्यांचे, एक 2 सदस्यांचा; महाविकास आघाडीची मोट बांधणार का?

| Updated on: Sep 23, 2021 | 10:48 AM

नाशिक (Nashik) महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation) आता तीन सदस्यीय प्रभाग रचना राहणार आहे. त्यानुसार एकूण 41 प्रभाग असणार आहेत. त्यातील 40 प्रभाग हे तीन सदस्यांचे असतील, तर एक प्रभाग हा 2 सदस्यांचा असेल. यामुळे महाविकास आघाडीची मोट पालिका निवडणुकीत बांधली जाणार का, अशी चर्चा सुरू आहे.

चर्चा तर होणारचः नाशिकमध्ये 40 प्रभाग तीन सदस्यांचे, एक 2 सदस्यांचा; महाविकास आघाडीची मोट बांधणार का?
नाशिक महापालिका.
Follow us on

नाशिकः नाशिक (Nashik) महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation) आता तीन सदस्यीय प्रभाग रचना राहणार आहे. पालिकेच्या एकूण 122 जागा आहेत. त्यानुसार एकूण 41 प्रभाग असणार आहेत. त्यातील 40 प्रभाग हे तीन सदस्यांचे असतील, तर एक प्रभाग हा 2 सदस्यांचा असेल. (40 wards of Nashik Municipal Corporation with three members, one with 2 members, Will the Mahavikas Aghadi be formed?)

नाशिक शहराची 2011 च्या जनगणनेुसार 14 लाख 86 हजार लोकसंख्या आहे. ही आकडेवारी गृहीत धरूनच प्रभागांची रचना केली जाईल. त्यात सुमारे 36 हजारांचा एक प्रभाग असण्याची शक्यता आहे. त्यानुसार 40 प्रभाग हे तीन सदस्यीय, तर एक प्रभाग हा 2 सदस्यीय असेल. यापूर्वी 2007 च्या निवडणुकीतही तीन सदस्यीय प्रभाग रचना होती. त्याचा फायदा भाजप-शिवसेनेला झाला होता. त्यांच्याच बाजूने मतदारांनी कौल दिला होता. आता यावेळेसही हा फायदा भाजप-शिवसेनेला होईल, अशी शक्यता आहे. विशेषतः नाशिकमध्ये भाजपला बहुसदस्यीय प्रभाग रचना पथ्यावर पडणार आहे. शिवसेनेची खरे तर दोन सदस्यीय प्रभाग रचनेची मागणी होती. मात्र, शिवसेनेचे संघटन कौशल्य आणि हवा निर्माण करण्याच्या पद्धतीमुळे ते सहज तरून जाऊ शकतात. यात खरी कोंडी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची होऊ शकते. कारण प्रत्येक प्रभागात तीन उमेदवार देणे, तितकी चांगली माणसे पक्षात शोधणे, हे आव्हानात्मक मानले जात आहे. त्यामुळेच राज्याप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही महाविकास आघाडीची मोट बांधली जावू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

इच्छुक लागले कामाला

प्रभाग रचनेचा निर्णय झाल्यापासून महापालिका निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक कामाला लागले आहेत. त्यांनी मतांच्या जमवाजमवीची गणिते मांडायला सुरुवात केली आहे. खरे तर यापूर्वीच अनेकांनी आपापल्या भागातील मतदारांमध्ये संपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जात आहे. आता सारेच चित्र स्पष्ट झाल्याने आगामी काळात या कामाला गती येणार आहे.

पालिकेतील पक्षीय बलाबल

नाशिकमध्ये यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी 29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय होते. या बहुसदस्यीय प्रभाव पद्धतीचा भाजपला पुरेपुर फायदा झाला. त्यांनी महापालिकेत निर्विवाद सत्ता काबीज केली. महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यानंतर शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले होते. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत होऊन त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या होत्या. (40 wards of Nashik Municipal Corporation with three members, one with 2 members, Will the Mahavikas Aghadi be formed?)

इतर बातम्याः

नारायण राणेंच्या अटकेचा आदेश काढणारे नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे राज ठाकरेंच्या भेटीला

नाशिक पालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार; शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पुन्हा गोची