नाशिकमध्ये मनपा आणि मूर्तीकारांचा पुढाकार, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘माझा बाप्पा’ उपक्रम

| Updated on: Sep 02, 2021 | 4:52 PM

नाशिक महानगर पालिका आणि नाशिक जिल्हा शाडू माती मूर्तिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझा बाप्पा' ही संकल्पना राबवण्यात आली आहे. शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करणारे कलाकार एकत्र आले आहेत. यातून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा हीच भावना 'माझा बाप्पा' या संकल्पनेतून पुढे आली आहे.

नाशिकमध्ये मनपा आणि मूर्तीकारांचा पुढाकार, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी माझा बाप्पा उपक्रम
Follow us on

नाशिक : नाशिक महानगर पालिका आणि नाशिक जिल्हा शाडू माती मूर्तिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझा बाप्पा’ ही संकल्पना राबवण्यात आली आहे. शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करणारे कलाकार एकत्र आले आहेत. यातून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा हीच भावना ‘माझा बाप्पा’ या संकल्पनेतून पुढे आली आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती, त्यावर वापरले जाणारे केमिकलयुक्त रंग यामुळे गोदावरी नदीचे पाणी प्रदूषित होतेय. हे थांबावण्यासाठी महापालिका तसेच शाडू माती मूर्ती संघटनेच्यावतीने ‘मिशन विघ्नहर्ता’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

गणेशभक्तांना ऑनलाइन पद्धतीने मूर्ती आरक्षित करण्याची सुविधा

‘माझा बाप्पा’ या संकल्पनेतून घरगुती गणेश उत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांना ऑनलाइन पद्धतीने मूर्ती आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या वेबसाईटचे उद्घाटन पोलीस आयुक्त दीपक पांडेय आणि मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त प्रवीण आष्टीकर, शहर अधीक्षक अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापक डॉ आवेश पलोड हेही उपस्थित होते.

“गोदावरी नदीचं पावित्र्य जपणं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी”

गोदावरी नदीचे पावित्र्य जपणे, गोदावरीला प्रदूषणमुक्त करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. या उपक्रमाला महापालिका आयुक्तांसोबतच पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी देखील शुभेच्छा दिल्यात. पर्यावरणाचा होणारा ह्रास टाळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘माझा बाप्पा’ संकल्पनेला नाशिककर नागरिक नक्कीच प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विसर्जनाच्या दिवशी महापालिकेच्या वतीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीसाठी अमोनिया पावडरचे मोफत वाटप देखील करण्यात येणार आहे.

“पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी माझा बाप्पा उपक्रम”

नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव म्हणाले, “मूर्तिकारांना एक व्यासपीठ मिळावं, मोठ्या व्यापाऱ्याकडून त्याची पिळवणूक होऊ नये आणि पर्यावरणपुरक चांगला गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी माझा बाप्पा ही संकल्पना राबवण्यात आली. कलाकारांनी तयार केलेल्या मूर्ती थेट ग्राहकांना मिळाव्यात आणि यातून कलाकारांना दोन पैसे मिळतील या हेतूनं मनपाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत आहोत.”

“प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्ती खरेदी करण्याऐवजी शाडूच्या मूर्ती घ्याव्यात”

“मी नागरिकांना आणि आमच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाहेरुन व्यापाऱ्यांकडून प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्ती खरेदी करण्याऐवजी या ठिकाणी येऊन शाडूच्या मूर्ती घ्याव्यात. असं केल्यास या कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. यामुळे या उत्सवाचा वेगळा आदर्श लोकांसमोर नेता येईल. मागच्यावेळी देखील कोरोना होता त्यामुळे नियम सर्वांना माहिती आहेत. सर्वांनी कोरोना नियमांचं पालन करत या उत्सवाचा आनंद घ्यावा,” असंही आवाहन कैलास जाधव यांनी व्यक्त केलं.

नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय म्हणाले, “आयुक्तांनी खूप चांगला उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी देखील पर्यावरण जपण्यासाठी शाडूच्या मातीचे गणपती विकत घ्यावेत.शासकीय कर्मचारी, अधिकारी आहेत त्यांनीही या मूर्ती घेऊन आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा.”

हेही वाचा :

‘सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोना विरोधात’, आरोग्य उत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

दहीहंडी आणि गणेशोत्सवात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लावण्याची केंद्राची सूचना

‘हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचं आंदोलन नाही’, दहीहंडी उत्सवावरुन मुख्यमंत्र्यांचा मनसे, भाजपला टोला

व्हिडीओ पाहा :

Environment friendly Ganeshotsav initiative in Nashik by corporation and Artist