संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही, काय बडबड करायची करू दे; गिरीश महाजन यांचा पलटवार
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "राऊत यांच्या जिभेला हाड नाही, त्यांच्या बडबडीने काही फरक पडत नाही," असे महाजन म्हणाले. नाशिकच्या टीकेवर स्पष्टीकरण देत, राऊतांना एक झेडपी अध्यक्ष निवडून दाखवण्याचे खुले आव्हानही त्यांनी दिले. ही राजकीय जुगलबंदी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.

संजय राऊत याच्या जिभेला हाड नाही. पंतप्रधान, न्यायालय, निवडणूक आयोग सगळ्यांच्या विरोधात राऊत काय काय बोलतात, त्यांच्या जिभेला काही हाड नाही. त्यांना काय बडबड करायची ते करू दे. त्यांच्या बडबडीने काही फरत पडत नाही. आम्ही आमचं काम करत राहू, अशा शब्दात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर घणाघाती टीका केल्यानंतर महाजन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे..
खासदार संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिक येथून त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडले. नाशिकच्या खड्ड्यांवरून आणि कुंभमेळ्यावरून राऊत यांनी महाजन यांच्यावर टीका केली होती. नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आल्याचा हल्ला त्यांनी केला होता. त्याला महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊतांच्या जीभेला हाड नाही. त्यांच्याकडे दोन खासदारांशिवाय खासदार राहिले नाही. ते कुणा विरुद्ध काय बोलत असतात. हे महाराष्ट्राला माहिती आहे. अशा शब्दात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे.
एक झेडपी अध्यक्ष करून दाखवास
येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आहेत. या निवडणुकीत राऊत यांनी ठाकरेंचा एक झेडपी किंवा झेडपी अध्यक्ष करून दाखवावा. उगाच बाष्फळ बडबड करू नये, असे खुले आव्हानच महाजन यांनी संजय राऊत यांना दिलं.
म्हणून उल्लेख केला असावा
कुंभमेळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत महाजन यांचा उल्लेख पालकमंत्री करण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कुंभमेळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत आपला पालकमंत्री म्हणून उल्लेख आहे. पण तो माजी पालकमंत्री म्हणून उल्लेख आहे. अनेक आमदार, खासदार आणि मंत्री आपल्या पदासमोर माजी लिहितात. तसेच माझ्या पदा समोर लिहिले असावे, असे त्यांनी स्पष्ट केलं.
तापामुळे गेले नसतील
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला जयंत पाटील उपस्थित नव्हते, यावरून महाजन यांनी मिश्किल टोलेबाजी केली. जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या बैठकीला गैरहजर आहेत. सध्या फ्लूची साथ आहे. ताप वाढत आहे. त्यांची तब्येत बिघडली असेल. त्यामुळे ते बैठकीला गेले नसतील, अशा शब्दात जयंत पाटलांच्या शरद पवारांच्या बैठकीला गैरहजर राहण्याच्या भूमिकेवर महाजन यांनी मिश्किल टिपणी केली.