शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, सहन करू, पण उद्योजकांना नको; शिंदेंच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी "शेतकऱ्यांनी त्रास सहन करावा, पण उद्योजकांना नको" असे वादग्रस्त विधान केले आहे. जळगावमधील कार्यक्रमात ते म्हणाले की, विजेअभावी शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकांचे मोठे नुकसान होते. या धक्कादायक वक्तव्यामुळे पाटील यांच्यावर सर्वत्र टीका होत असून, त्यांना विरोधकांनी धारेवर धरले आहे.

शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, सहन करू, पण उद्योजकांना नको; शिंदेंच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
gulabrao patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2026 | 3:28 PM

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आपल्या विधानांनी नेहमी चर्चेत असतात. कधी शेरोशायरीतून विरोधकांना जोरदार उत्तर देतात, कधी आपल्या तडाखेबंद भाषणातून समोरच्याला नामोहरण करतात तर कधी आपल्याच विधानाने स्वत:ची कोंडी करून घेतात. आताही गुलाबराव पाटील यांनी स्वत:ची कोंडी करून घेतली आहे. त्यांनी उद्योजकांची बाजू घेणारं आणि शेतकऱ्यांना कमी लेखणारं विधान केलं आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील चर्चेत आले आहेत.

गुलाबराव पाटील जळगावच्या एका कार्यक्रमात सुस्साट बोलत होते. आमची हात जोडून विनंती आहे की.. शेतकऱ्यांना थोडासा त्रास झाला तर आम्ही सहन करून घेऊ. पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका. एवढीच आमची हात जोडून विनंती आहे, असे गुलाबराव पाटलांनी म्हटल आहे. गुलाबराव पाटील यांच्या या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पाटील असं का म्हणाले? याची चर्चा आता संपूर्ण राज्यात सुरू झाली असून त्यांच्या या विधानावरून त्यांना विरोधकांनी घेरलं आहे.

मोठं नुकसान सहन करावं लागतं

लाईट नसेल तर एक वेळ मी शेतकरी म्हणून आम्ही सहन करून घेऊ. उद्योजकाला लाईटचा फार त्रास होतो. उद्योगाची वीज बंद झाली तर त्याला मोठे नुकसान सहन करावं लागतं. उद्योग बंद असताना देखील मजुरांची मजुरी द्यावी लागते. उत्पादन निघत नाही. विजेच्या अडचणीमुळे नवीन उद्योजक देखील उद्योग सुरू करण्यासाठी विचार करतात, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला. जळगावच्या चिंचोली येथील वीज उपकेंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

गुलाबरावांना समज द्या

दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या या विधानाच शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी समाचार घेतला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांना सरकारमधील प्रमुख नेत्यांनी समज द्यावी. तुमच्याकडून काही देणं होत नाही तर शेतकऱ्यांचा असा अपमान तरी तुम्ही करू नका?, असा संताप व्यक्त करतानाच भविष्यात गुलाबरावांनी असं विधान करू नये म्हणून वरिष्ठ नेत्यांनी त्यांना आताच समज दिली पाहिजे, असं रोहिणी खडसे म्हणाल्या. विजेचा त्रास शेतकऱ्यांना झाला तर चालेल. मात्र उद्योजकांना व्हायला नको, असं असंवेदनशील वक्तव्य गुलाबरावांनी करणं चुकीचं आहे, असंही त्या म्हणाल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us