पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयाच्या साखर कारखान्यावर 12 तास छापेमारी, सकाळी पुन्हा झडाझडती; नंदूरबारमध्ये उलटसुलट चर्चा

| Updated on: Oct 08, 2021 | 10:41 AM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयाच्या नंदूरबारमधील साखर कारखान्यावर धाड मारण्यात आली आहे. (IT department raids in nandurbar sayan sugar factory)

पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयाच्या साखर कारखान्यावर 12 तास छापेमारी, सकाळी पुन्हा झडाझडती; नंदूरबारमध्ये उलटसुलट चर्चा
ayan sugar factory
Follow us on

नंदूरबार: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयाच्या नंदूरबारमधील साखर कारखान्यावर धाड मारण्यात आली आहे. आयकर विभागाने काल 12 तास या कारखान्यात झाडाझडती घेतली. त्यानंतर आज सकाळीही छापेमारी सुरू केली आहे. साखर कारखान्याच्याबाहेर मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नंदूरबारमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

पार्थ पवार यांचे निकटवर्तीय सचिन शृंगारे यांचा नंदूरबारच्या समशेरपूर येथे आयान मल्टिट्रेट प्रायव्हेट लिमिटेड हा साखर कारखाना आहे. या कारखान्यावर काल आयकर विभागाने छापा मारला होता. आयकर विभागाचे पाच ते सहा अधिकारी ही तपासणी करत होते. मात्र आयकर विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. काल 12 तासाच्या तपासणीनंतर आज सकाळी पुन्हा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीला सुरुवात केली आहे. आयकर विभागाच्या वतीने या प्रकरणात अजून कुठलीही प्रतिक्रिया आली नाहीये. आयकर विभागाच्या हाती काय लागते तपासणी संपल्यावर समोर येणार आहे.

पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयावर छापा

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने काल छापा टाकला होता. विशेष म्हणजे कालपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली, त्याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला.

आजही धाडसत्रं

अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, तसेच नातेवाईकांच्या मुंबई, गोवा, सातारा, पुणे, बारामती इथल्या कंपन्यांवर आजही आयकर विभागाकडून छापेमारीची शक्यता आहे. मुंबईत पार्थ पवार यांचे कार्यालय, शिवालिक ग्रुप, चोराडिया ग्रुप, डीबी रियालिटी, या कंपन्यांच्या मालकांच्या घरी आयकर विभागाकडून छापेमारी झाल्याची सूत्रांची माहिती.

काय आहे प्रकरण?

अजित पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने 7 ऑक्टोबरला धाडी टाकल्या. अजित पवारांसह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवरही आयकरने छापेमारी केली. आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याची माहिती आहे.

 

संबंधित बातम्या:

अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर दिवसभर धाडी, दिल्लीतून जारी करण्यात आलेली आयकर विभागाची प्रेस नोट जशीच्या तशी

VIDEO | तराफ्याचे इंजिन बंद, भल्या पहाटे अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले

पाहुणे घरात आहेत, त्यांचं काम सुरु आहे, ते गेल्यावर भूमिका मांडतो, आयकर धाडीवर अजित पवारांचा टोला

(IT department raids in nandurbar sayan sugar factory)