Rajmal Lakhichand Jewellers च्या 70 मालमत्तांवर ईडीची टाच; पाच शहरातील मालमत्ता जप्त

जळगावच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्सची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. पाच शहरातील ही मालमत्ता जप्त केल्याने जळगावमध्ये खळबळ उडाली आहे.

Rajmal Lakhichand Jewellers च्या 70 मालमत्तांवर ईडीची टाच; पाच शहरातील मालमत्ता जप्त
Rajmal Lakhichand Jewellers
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2023 | 12:28 PM

जळगाव | 15 ऑक्टोबर 2023 : जळगावातील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या शोरूममध्ये काल संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीत शोरूममधील अकाऊंट विभाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि संगणक जळून गेले आहे. त्यामुळे राजमल लखीचंद ज्वेलर्सचं मोठं नुकसान झालेलं आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्सवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाच ईडीने या ज्वेलर्सच्या 70 मालमत्तांवर टाच आणली आहे. या सर्व मालमत्ता ईडीने तात्पुरत्या जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे राजमल लखीचंद ज्वेलर्सची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.

ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या मालमत्तांवर मोठी छापेमारी केली आहे. जळगावसह मुंबई, सिल्लोड, ठाणे आणि कच्छमधील एकूण 70 मालमत्ता ईडीने तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. एकूण 315 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आधीच आग लागून नुकसान झालेलं असताना आता ईडीने मुसक्याच आवळल्याने राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या तोंडचं पाणीच पळालं आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत कशा कशाचा समावेश आहे हे स्पष्ट होऊ शकलं नाही.

40 तास ईडीची चौकशी

या आधी ईडीने ऑगस्टमध्ये राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या शोरूम, कार्यालय आणि घरांवर छापेमारी केली होती. यावेळी ईडीने 40 तास चौकशी केली होती. त्यावेळी ईडीने जळगाव, नाशिक आणि ठाण्यासह 13 ठिकाणी छापेमारी केली होती. ईडीने मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने रोकड तसेच मुख्य दस्तऐवज जप्त केले होते. ईडीच्या कारवाईनंतरही काही तासांमध्येच आर. एल. ज्वेलर्सचे कर्मचारी कामावर हजर झाले होते. आम्हाला आमच्या मालकावर पूर्ण विश्वास आहे आणि ते सर्वकाही नव्याने उभं करतील, अशी प्रतिक्रिया यावेळी कर्मचाऱ्यांनी दिली होती.

कुटुंबातील चौघांना समन्स

40 तास छापेमारी करताना ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक माजी खासदार ईश्वरलाल जैन, त्यांच्या पत्नी आणि चिरंजीव माजी आमदार मनीष जैन आणि त्यांच्या सून या चार जणांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. समन्सनुसार 22 ऑगस्ट रोजी मनीष जैन आणि त्यांच्या पत्नी या दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 ऑगस्ट रोजी ईश्वरलाल जैन आणि त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावलं होतं.