आधी ईडीची धाड, आता आग, शुक्लकाष्ठ संपेना, जळगावच्या Rajmal Lakhichand Jewellersला भीषण आग

जळगावातील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या शोरूमधील अकाऊंट विभागाला काल संध्याकाळी अचानक आग लागली. या आगीत अकाऊंट विभागाची खोली जळून खाक झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आधी ईडीची धाड, आता आग, शुक्लकाष्ठ संपेना, जळगावच्या Rajmal Lakhichand Jewellersला भीषण आग
rajmal lakhichand jewellers
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2023 | 8:54 AM

जळगाव | 15 ऑक्टोबर 2023 : जळगावातील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ऑगस्टमध्ये ईडीच्या धाडी पडल्या होत्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या धाडीमुळे राजमल लखीचंद ज्वेलर्स अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला. मात्र, त्यानंतरही राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या मागचं शुक्लकाष्ठ काही संपलेलं दिसत नाही. काल रात्री राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या शोरूमला भीषण आग लागली. ही आग अत्यंत भयानक होती. आगीत शोरूममधील अकाऊंट विभाग जळून खाक झाला असून ज्वेलर्सचं प्रचंड नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे.

जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्सचा हा शोरूम अत्यंत प्रसिद्ध आहे. या शोरूममध्ये ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते. पण काल संध्याकाळी अचानक अकाऊंट विभागाच्या खोलीत भीषण आग लागली. ही आग बघता बघता वाढली आणि आगीचे लोळ उठले. त्यामुळे आगीत अकाऊंट विभाग जळून खाक झाला आहे. अकाऊंट विभागाच्या खोलीतील कागदपत्रेही जळून खाक झाली आहेत. तसेच विभागातील साहित्याचा कोळसा झाला आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

अचानक आग लागली अन्…

राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या शोरूममध्ये वरच्या मजल्यावर अकाऊंट विभाग आहे. या खोलीत सायंकाळी अचानक आग लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. शोरूममध्ये अचानक पळापळ सुरू झाली. काही कर्मचारी आणि मालक तळमजल्यावर कामात व्यस्त होते. आगीचे लोळ आणि धूर येताच हे कर्मचारी घाबरले आणि त्यांनी शोरूमच्या बाहेर धाव घेतली.

आगीची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळ गाठून पाण्याचा मारा केला. तसेच फोमच्या साह्याने आग आटोक्यात आणली. ऐन सणासुदीच्या काळात या ज्वेलर्सला आग लागल्याने ज्वेलर्सचं मोठं नुकसान झालं आहे.

कागदपत्रे जळून खाक

आगीत राजमल लखीचंद ज्वेलर्स दागिन्यांच्या समूहाच्या व्यवहारासंदर्भातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे, संगणक तसेच इतर साहित्य जळून खाक झाले आहेत, अशी माहिती राजमल लखीचंद ज्वेलर्सचे संचालक मनीष जैन यांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. आगीचं नेमकं कारण स्पष्ट झालं नाही. अग्निशमन दल आणि पोलीस या घटनेचा तपास करणार आहेत. तसेच शोरूममध्ये अग्निरोधक यंत्रणा होती की नाही याचीही तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे राजमल लखीचंद ज्वेलर्सचं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे.